ठळक मुद्दे ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी...’ ही गणेश वंदना सादर करत वादकांनी गणरायाची आराधना केली तब्बल दोन हजार तरुण वादकांचा समूह गोदाकाठावर एकत्रगोदाकाठावरील श्री नारोशंकर मंदिरालगत महावादनवादकांनी तब्बल एक तास ‘महावादन’ केले
नाशिक : हिंदू नववर्षाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ होत आहे. हिंदू नववर्षाच्या वातावरण निर्मितीसाठी शंभर नव्हे, दोनशे नव्हे, तर तब्बल दोन हजार तरुण वादकांचा समूह गोदाकाठावर बुधवारी (दि. १४) एकत्र जमला. एक हजार ढोल, २०० ताशे आणि २१ टोलच्या आधारे विविध ताल वाजवत वादकांनी तब्बल एक तास ‘महावादन’ केले. या सामूहिक ढोलवादनाने गोदाकाठ दुमदुमला.
निमित्त होते, नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने गोदाकाठावरील श्री नारोशंकर मंदिरालगत महावादनाचे. या महावादनामध्ये शहरासह जिल्ह्यातील तब्बल २१ ढोलपथकांच्या दोन हजार वादकांनी सहभागी होऊन एकापेक्षा एक सरस तालांचे कौशल्यपूर्ण सादरीकरण केले. मागील तीन वर्षांपासून हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वागतयात्रा समितीकडून गोदाकाठावर महावादन व महारांगोळी उपक्रम राबविला जात आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. याप्रसंगी क. का. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब वाघ, कर्मवीर व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे हेमंत धात्रक, संदीप फाउण्डेशनचे संदीप झा, गुरु गोविंदसिंग फाउण्डेशनचे गुरुदेवसिंग बिर्दी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ढोल-ताशांचे पूजन करण्यात आले.
प्रारंभी ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी...’ ही गणेश वंदना सादर करत वादकांनी गणरायाची आराधना केली आणि त्यानंतर शंखध्वनीच्या निनादाने उपस्थित वादकांनी एक-एक ताल सामूहिकरीत्या सादर करण्यास सुरुवात केली अन् एकाचवेळी एक हजार ढोल, २०० ताशे व २१ टोलचा एकत्रित आवाज घुमू लागला. महावादनाच्या उपक्रमात सहभागी वादकांमध्ये तरुण-तरुणींसोबत चिमुकल्या शालेय मुलांचाही सहभाग होता. तरुणांचा सळसळता उत्साह अन् त्याच जोशात ढोल-ताशावर पडणाऱ्या टिपरांमुळे अवघा गोदाकाठ गुंजला होता.शुक्रवारी महारांगोळीहिंदू नववर्ष स्वागतासाठी वातावरण निर्मिती व्हावी, हिंदू संस्कृतीचा मान-सन्मान राखावा आणि प्रत्येकाने नववर्ष तितक्याच उत्साहात साजरे करावे या उद्देशाने मागील तीन वर्षांपासून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर महावादनाचा कार्यक्रम राबविला जात असल्याची माहिती संयोजकांच्या वतीने यावेळी देण्यात आली. येत्या शुक्रवारी (दि. १६) गोदाकाठावर महिला सकाळी महारांगोळी रेखाटणार आहेत.