कोरोना महामारीमुळे यंदा निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:01 PM2020-06-18T17:01:18+5:302020-06-18T17:02:07+5:30
मोजक्या भाविकांची उपस्थिती : फिजिकल डिस्टन्सिंग राखत नाथांचे नामस्मरण
लोकमत न्यूज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीमुळे यंदा टाळ-मृदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांची पंढरीला जाणाºया वारीची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली. त्र्यंबकेश्वर येथून दरवर्षी पंढरपूरला प्रस्थान करणाºया पालखीसोबतच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पादुका जात असल्याने या कालावधीत नाथांचा येणारा संजीवन समाधी सोहळाही वारीतच साजरा होत असतो. यंदा मात्र कोरोनामुळे वारी थांबल्याने निवृत्तीनाथांचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा गुरूवारी (दि.१८) ज्येष्ठ वद्य द्वादशीला त्र्यंबकेश्वरीच विश्वस्त आणि मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी भजन-कीर्तनाबरोबरच समाधीची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली.
दरवर्षी आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची पालखी पायी दिंडीने पंढरपूरला मार्गस्थ होत असते. पालखी रथात संतश्रेष्ठांच्या पादुका विराजमान असतात. पायी दिंडीच्या वेळापत्रकानुसार सदर पालखी रथ वाटेत नाथांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठ वद्य द्वादशीला अहमदनगर येथे पोहोचत असतो. त्यामुळे पालखी येण्यापूर्वीच नगर येथे संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी केली जात असते. पालखीची विधीवत पूजाअर्चा करत त्याठिकाणी भजन-कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो. एक दिवसाचा मुक्काम आटोपून पालखी पुढच्या मुक्कामाला प्रस्थान करत असते. हा नेम दरवर्षी न चुकता होत आलेला आहे. यंदा मात्र, कोरोना महामारीमुळे वारीची परंपरा खंडित झाली आणि अन्य संतांप्रमाणेच निवृत्तीनाथांचीही पालखीही त्र्यंबकेश्वरीच राहिली. सदर पालखी आता येत्या ३० जूनला मोजक्या विश्वस्त आणि भाविकांच्या उपस्थितीत शिवशाही बसने पंढरपूरला जाणार आहे. नाथांच्या पादुका यंदा समाधी स्थळीच असल्याने ७२४ वा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरीच गुरूवारी साजरा करण्यात आला. यावेळी विधींचे पौराहित्य गोसावी बंधु यांनी केले. तर संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त मंडळ उपस्थित होते.