येथील कर्मवीर विद्यालयाच्या प्रांगणामधून पाटबंधारे विभागाचा कालवा गेलेला आहे. शाळेत सुमारे तीन हजारांच्या आसपास पटसंख्या असल्याने दोन्ही प्रांगणात विद्यार्थ्यांंचा वावर असतो. कालव्याला पाणी आल्यास शाळेसह पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. सकाळी शाळा भरण्यापूर्वी किंवा शाळा सुटल्यानंतर अनेक मुले पाटालगत असलेल्या भिंतीवर बसलेली असतात. कालव्याला पाणी असल्यास सदर चित्र धोकेदायक असल्याने शाळा प्रशासन तसेच गावक-यांनी चिंता व्यक्त करीत भिंतीचे काम करणे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या कालव्यावर स्लॅब टाकण्याची वारंवार विनंती करु णारे निवेदन देऊनही पाटबंधारे विभागाने त्याला केराची टोपली दाखवली आहे. परिणामी शाळा प्रशासन व गावक-यांनी पाटबंधारे विभागापुढे हात टेकले आहेत. शाळा प्रशासनाला विद्यार्थी सुरक्षिततेसाठी डोळ्यात तेल घालून लक्ष घालावे लागत असून, एखादी अनुचित घटना घडण्याची वाट संबंधित विभाग बघत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थात विचारला जात आहे.शाळेची भव्यदिव्य इमारत असून नुतन इमारतीचे काम पुर्णत्वास आले आहे. भव्य असे प्रांगण असताना मधोमध असणारा कालवा धोकादायक ठरु पाहत आहे. पहिली ते बारावीपर्यंत विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र धोकादायक कालव्याच्या समस्यांचा निपटारा अद्याप झालेला नाही. येथील विद्यालयात परिसरातील डोंगरगाव, धारणगाव, देवगाव, भरवस, गोंदेगाव यासह पंचक्र ोशीतील वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. अनेकदा प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूने कालव्याच्या भिंतीवर शाळा सुटल्यानंतर शाळाबाह्य मुले बसलेली असतात. सदर चित्र धोकेदायक आहे. शाळेच्या जागेच्या मध्यातूनच कालवा गेल्याने विद्यार्थी संख्येचा विचार करता उपलब्ध मैदान अपुरे पडत आहे. विद्यालयाची नवीन इमारत बांधकामाच्या समोर लागून कालवा असल्याने विद्यार्थी त्यात पडून दुर्घटना घडू शकते. प्राथमिक विद्यालयाच्या मागील संरक्षक भिंतदेखील पडली आहे. सदर बाब ग्रामस्थांनी विद्यालयाच्या लक्षात आणून दिली असून विद्यार्थी हिताच्या दृष्टीने स्लॅब टाकण्याची मागणी केली जात आहे.
पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 6:22 PM