आदान-प्रदानामुळे नाशकात गुंतवणूक वाढण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:24 PM2019-07-20T23:24:21+5:302019-07-21T00:18:38+5:30
नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले.
सिडको : नाशिकमध्ये पार पडलेल्या बिझनेस टू बिझनेस उपक्रमाच्या या माध्यमातून शुक्रवारी देशभरातून आलेल्या मोठ्या कंपन्यांनी अंबड, सातपूर, सिन्नर येथील ७४ कंपन्यांना भेटी देऊन व्यावसायिक माहितीचे आदान-प्रदान केले. तसेच काही कंपन्यांनी नाशिकच्या ४० कंपन्यांना उत्पादनाची नवी संधी निर्माण करून देतानाच काही कंपन्यांनी त्वरित वेंडरचे रजिस्ट्रेशन करून घेतले आहे. त्यामुळे नाशिकमधील औद्योगिक गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आयमाचे अध्यक्ष वरुण तलावर यांनी व्यक्त केली आहे.
अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये अंबड इन्स्टिट्यूट अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनतर्फे आयोजित दोन दिवसीय बिझनेस टू बिझनेस उपक्रमाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. या औद्योगिक आणि व्यावसायिक उपक्रमाला देशभरातील विविध कंपन्यांचा प्रतिसाद मिळाला असून, यापुढील काळात नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रात गुंतणूक वाढण्यास या बिझनेस मीटचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार यांच्यासह सरचिटणीस ललित बूब, बीटूबीचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी व्यक्त केला आहे.
याप्रसंगी राजेंद्र्र आहिरे, धनंजय बेळे, सुदर्शन डोंगरे, राजेंद्र पानसरे, योगीता आहेर, उमेश कुलकर्णी, विनायक मोरे, सुनील जाधव, जयंत पवार, राहुल गांगुर्डे, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.