वातावरणातील असमतोलामुळे द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:40 PM2017-12-04T12:40:49+5:302017-12-04T12:41:18+5:30
वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे.
वणी - असमतोलीत हवामानामुळे द्राक्षबागांवर प्रतिकुल परिणाम होत असून द्राक्षातील ब्रिक्स म्हणजेच साखरेचे प्रमाण वाढण्यावर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली आहे. द्राक्षपंढरी म्हणून दिंडोरी तालुका परिचीत असून कसदार व पोषक जमीन पाण्याचे स्त्रोत यामुळे द्राक्ष लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढते आहे. विविध जातीची द्राक्षे उत्पादनात तालुका अग्रेसर असुन नवनवीन अद्यावत तंत्राचा वापर करून परराज्यात तसेच परदेशात नावलौकीक प्राप्त केला आहे, मात्र सध्या द्राक्ष उत्पादकांना वेगळ्याच अस्मानी संकटाला सामोरे जावे लागते आहे. गत काही दिवसात थंडीचे प्रमाण वाढले होते, त्याबरोबर ढगाळ हवामानाने उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले थंडीचे प्रमाण सद्यस्थितीत तुलनात्मकरित्या कमी झाले असले तरी ढगाळ हवामानाच्या समस्येने उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. अशा वातावरणात भुरी मिलीबग अशा रोगांना आमंत्रण मिळते तर द्राक्षातील साखरवाढीवर याचा प्रतिकुल परिणाम होतो सर्वसाधारण स्थितीत द्राक्षातील साखरेचे प्रमाण १८ टक्के किंवा त्यापुढे पाहिजे मात्र आता १३ टक्के एवढेच प्रमाण काही भागात असल्याची माहिती काही उत्पादकांनी दिली.
परप्रांतातील व्यापारी मोठ्या प्रमाणावर द्राक्ष खरेदीसाठी उत्सुक आहेत, मात्र प्रतिकुल वातावरणामुळे द्राक्षबागा पूर्णत: परिपक्व होण्यास अडचणी येत आहेत. अपवावात्मक स्थितीत काही द्राक्षबागाची खुडणी सुरू आहे, मात्र दराबाबत घासाघीस करावी लागते आहे.
दरम्यान नोटबंदीच्या सुलतानी फटक्याच्या विळख्यात सर्वच उद्योगधंदे सापडल्याचे चित्र दिसते आहे. त्यात शेतीव्यवसायालाही मोठा फटका बसला आहे. परिस्थिती हळुहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे जाणवत असताना द्राक्ष उत्पादक आता सुलतानीबरोबर अस्मानी संकटात सापडला आहे. वर्षभराचे शेतीचे नियोजन उदरनिर्वांहाची तरतुद, मुलांची शैक्षणिक जबाबदारी, विवाह या सगळ्या बाबींची पूर्तता करताना द्राक्ष उत्पादनावर व विक्र ी करून मिळालेल्या पैशावर उत्पादकांचे नियोजन असते मात्र आता प्रतिकुल हवामानापुढे हतबल झालेले उत्पादक रोगप्रतिबंधासाठी एकरी दहा हजाराचा खर्च फवारणीसाठी करीत आहेत. सदरची चिंताजनक बाब उत्पादकांची कसोटी पाहणारी असल्याने द्राक्ष उत्पादक हवालदिल झाले आहेत.