पांगरी : जागतिक कीर्तीचे देवस्थान बनलेल्या शिर्डी बसस्थानकातून रात्री ९ नंतर नाशिकला जाण्यासाठी बस नसल्याने बसफेरी वाढविण्याची मागणी साईभक्त व प्रवाशांनी केली आहे.प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या प्रमाणात बस नसल्याने परिसरातील प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. सिन्नर किंवा कोपरगाव आगाराने रात्री ८ ते १० च्या दरम्यान साध्या बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. शिर्डी येथून वावी, पांगरी, सिन्नर, नाशिक, मुंबई येथे जाणाºया प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे; परंतु संध्याकाळची ६ वाजून ४५ मिनिटांची सिन्नर आगाराची शिर्डी-नाशिक साधी बस गेल्यानंतर एकही बस नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते. साईभक्त व प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. सध्या रात्री ८ वाजता परळ आगाराची हिरकणी शिर्डी-दादर निमआराम, रात्री ९ वाजता कोपरगाव आगाराची शिर्डी-दादर निमआराम बस आहे. तथापि, सायंकाळी ७ वाजेनंतर नाशिककडे येण्यासाठी एकही साधी बस नाही. शिवाय रात्री ९ नंतर साधी किंवा निमआराम बस नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते.सध्या कोपरगाव आगारातर्फे नाशिकसाठी एक किंवा दोन तासाला बस सुरू आहे. त्याऐवजी शिर्डीवरून सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास एक साधी बस सुरू करण्यासह रात्री ९ वाजेनंतर नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिन्नर आगाराने रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान नाशिकसाठी बससेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.शिर्डी येथून नाशिकला जाण्यासाठी रात्री एकही बस नाही ही मोठी खेदजनक बाब आहे. रात्री नऊनंतर नाशिकसाठी बस चालू केल्यास आगाराच्या उत्पन्न वाढीबरोबर प्रवाशांची गैरसोयसुद्धा दूर होईल. सिन्नर किंवा कोपरगाव आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन रात्रीची बस सुरू करावी, अशी मागणी संजय पांगारकर, युनुस कादरी, सर्जेराव कलकत्ते, संदीप पगार, सर्जेराव पगार आदींसह प्रवाशांनी केली आहे.गर्दीचा हंगाम असल्यास शिर्डी येथून नाशिक जाण्यासाठी जादा बस सोडल्या जातात. तथापि, हंगाम संपल्यानंतर बससेवा बंद केली जाते. त्यामुळे नेहमी प्रवास करणाºया प्रवाशांना त्याचा उपयोग होत नाही. शिर्डी बसस्थानकातून नाशिकला जाण्यासाठी रात्री ८ वाजेनंतर बसफेºया वाढविण्याची गरज व्यक्त केली जात आहे.