अहो आश्चर्यम्...! केवळ लाईट नसल्यामुळे नाशिक महापालिकेची महासभा तहकूब
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 02:26 PM2019-07-19T14:26:59+5:302019-07-19T14:27:16+5:30
नाशिक महापालिकेची महासभा सकाळी साडेअकरा वाजता करण्यात आली होती
नाशिक : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या नाशिक महापालिकेची महासभा आज केवळ मुख्यालयात लाईट नसल्यामुळे पंधरा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यालयात जनरेटर असूनही त्यासाठी लागणारे डिझेल संपल्याचे लक्षात आल्यानंतर आणि नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आणि विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नाशिक महापालिकेची महासभा सकाळी साडेअकरा वाजता ठेवण्यात आली होती. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज सभेचे कामकाज सुरू होतानाच सभागृहात वीजपुरवठा नसल्याचे लक्षात आल्यानंतर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या मुख्यालयात जनरेटर उपलब्ध आहे. मात्र डिझेल संपले असल्याने ते सुरू करता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी जोपर्यंत वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे, अशी मागणी नगरसेवकांनी केली. त्यानुसार जनरेटर सुरू होईपर्यंत सभेचे कामकाज तहकूब करण्यात येईल, असे महापौरांनी जाहीर केले.
नाशिक महापालिका अत्यंत सधन आणि राज्यात ब दर्जा असून स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झाली आहे. मात्र केवळ वीज पुरवठा होत नाही आणि जनरेटर मधील डिझेल संपले या कारणामुळे सभा तहकुबीची नामुष्की प्रशासनावर आली आहे.
महापालिकेचे मुख्यालय साली 1993 साली बांधण्यात आले आहे. विधी मंडळाच्या धर्तीवर सभागृह आणि इमारत बांधण्यात आली आहे. त्यात हवा खेळती राहील असे नियोजन असल्याने सभागृहात एसी देखील नाही. निम्मे पंखे बंद आहेl. गेल्या वर्षी एअर कुलर बसविण्याचे ठरविण्यात आले, मात्र मंजूर प्रस्ताव धूळ खात पडून आहे.