नाशिक : सामुहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मागील काही वर्षांपासून मुस्लीम समाजातही पहावयास मिळत आहे. जुने नाशिकमध्ये काही संस्थांकडून सामुहिक विवाहचा उपक्रम सातत्याने राबविला जात असून नुकत्याच झालेल्या विवाह सोहळ्यात एकूण १२ जोडप्यांचा ‘निकाह’ पारंपरिक पध्दतीने पार पडला.समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा संकल्पनेची व्याप्ती मुस्लीम समाजात वाढविण्याचा प्रयत्न काही समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे. जुने नाशिकमधील आदर्श युवा मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने मुस्लीम सामुदायिक विवाह सोहळ्याचे सालाबादप्रमाणे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात एकूण १२ तरुण-तरुणींचे जोडपे विवाहबध्द झाले. या सोहळ्याला मुस्लीम समाजातील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मोईनुद्दीन अशरफ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी वधु-वरांना आशिर्वाद देत त्यांच्या पुढील वैवाहिक जीवनाच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार देवयानी फरांदे, शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी, नगरसेवक मुशीर सय्यद, गुलजार कोकणी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुन्नी मरकजी सीरत समितीचे हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी इस्लामी पध्दतीने १२ जोडप्यांचा पारंपरिक पध्दतीने निकाह लावला. दरम्यान, गोडसे व फरांदे यांनी मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढावे व समाजाची प्रगतीला हातभार लागेल असे मत व्यक्त केले व वधु-वरांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, संयोजकांच्या वतीने १२ जोडप्यांच्या व-हाडींसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संसारपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष बबलू शेख यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
नाशिकमध्ये बारा मुस्लीम जोडप्यांचा सामुहिक निकाह संपन्न; ज्येष्ठ धर्मगुरू सय्यद मोईनुद्दीन यांचे लाभले आशिर्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 8:20 PM
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा संकल्पनेची व्याप्ती मुस्लीम समाजात वाढविण्याचा प्रयत्न काही समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे.
ठळक मुद्देसोहळ्यात एकूण १२ तरुण-तरुणींचे जोडपे विवाहबध्द झाले.मुस्लीम समाजातील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत सय्यद मोईनुद्दीन अशरफ यांची प्रमुख उपस्थिती. जुने नाशिकमधील आदर्श युवा मल्टीपर्पज संस्थेच्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन