लोकमत न्यूज नेटवर्कसिन्नर : कर्जमाफी, शेतमालास हमीभाव मिळावा आदींसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपास सिन्नर शहर व तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेंढी चौफुलीवर दुधाची गाडी अडवून त्यातील दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील दापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला होता. तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्रे गुरुवारी बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध केला. पांगरी येथे शेतमाल घेऊन जाणारी वाहने अडवून परत पाठविण्यात आली. शेतकऱ्यांनी विविध मार्गांनी आंदोलन करून शासनाचा निषेध करीत कर्जमाफी व शेतमालास हमीभाव देण्याची मागणी केली. ऐतिहासिक अशा शेतकरी संपात तालुक्यातील सर्व गावांचे शेतकरी सहभागी झाल्याचे चित्र होते.शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी व विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून तहसील कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. त्याचा परिणामही दिसून आला. गावोगावी शेतकऱ्यांनी बैठका घेत शेतमाल विक्री न करण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याची शपथ घेतली. शेतकरी एकत्र जमा होऊन एकजूट ठेवण्याचे आवाहन करीत होते. सकाळी गावोगावी दूध संकलन केंद्रात कोणत्याही शेतकऱ्यांनी दूध घातले नाही. मऱ्हळ, खडांगळी, नायगाव खोऱ्यातील ब्राह्मणवाडे तसेच अन्य काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून शासनाच्या धोरणाचा निषेध केला. सिन्नर शहरातील भाजीबाजार ओस पडला होता. शेतकऱ्यांनी बाजारात शेतमाल विक्रीसाठी आणला नाही. व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्याचे चित्र होते. सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल व कांदे विक्रीसाठी न आल्याने बाजार समितीचे मुख्य कार्यालय ओस पडल्याचे चित्र होते. मुख्य कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात होता. मात्र शेतकऱ्यांनी माल न आणल्याने कोणतेही लिलाव झाले नाही. नांदूरशिंगोटे : येथे व परिसरात शेतकरी संपाला शंभर टक्के प्रतिसाद लाभला. शेतकऱ्यांनी कृषी माल व दूध संकलन केंद्र बंद ठेवून संपाची सुरुवात केली. कर्जमाफी व हमीभाव यांसह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. भाजीपाला, दूध आणि शेतमाल शहरात जाऊ न देण्याचा निर्धार गावोगावी करण्यात आला. नांदूरशिंगोटे, भोजापूर खोरे परिसर, मानोरी, मऱ्हळ, दापूर, दोडी बुद्रुक, चापडगाव, निऱ्हाळे आदी भागातील शेतकऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. कृषिमाल तसेच दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांनी संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. बाजारात दूध व भाजीपाला आणू नये असे आवाहन शेतकऱ्यांनी केले असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन केंद्राचे संचालकही संपात सहभागी झाले आहेत. परिसरातील सुमारे २५ च्या आसपास दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. नांदूरशिंगोटे येथे मोठी बाजारपेठ व व्यापारी वर्ग आहे. येथे शेतकऱ्यांनी दूध घरपोच केले नाही. भोजापूर खोरे परिसरातून मोठ्या प्रमाणात डाळिंब व अन्य भाजीपाला शहरात पाठविला जातो. परंतु या भागातील सर्व शेतकरी संपात सहभागी झाल्याने एकही वाहन नाशिक येथे कृषिमाल घेऊन गेले नाही. आपल्या भागातून कृषिमालाची वाहतूक होणार नाही याची काळजी संपात सहभागी शेतकरी घेत होते. प्रत्येक दूध व्यावसायिक व शेतकऱ्याला संपाविषयी माहिती देणारी पत्रके देण्यात येत होती व वाहनांवर स्टीकर लावले जात होते.नांदूरशिंगोटे गावातील तरुणांनी सकाळी एकत्र येऊन स्थानिक भाजीपाला व फळविक्रेते यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. परिसरातील दापूर येथील आठवडे बाजार गुरुवारी बंद ठेवण्यात आला होता. मऱ्हळ येथील शेतकऱ्यांनी सकाळी नांदूर-वावी रस्त्यावर दूध ओतून निषेध केला. चापडगाव येथील शेतकरी शंभर टक्के संपात सहभागी झाले होते. या भागातून शेतकऱ्यांनी भाजीपाला विक्रीसाठी नेला नाही.पाथरे येथे पुतळा जाळून निषेधपाथरे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पाथरे व परिसरातील शेतकऱ्यांनी शासनाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदविला. रस्त्यावर दूध ओतण्यासह शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाथरे परिसरातील शंभर टक्के शेतकरी संपात सहभागी झाले होते. पाथरे खुर्द, पाथरे बुद्रुक, वारेगाव, कोळगाव, माळवाडी, झापेवाडी, मीरगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने बसस्थानक परिसरात एकत्र जमा झाले होते. शेतकऱ्यांनी गावातून फेरी काढून संपात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शासनाचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. माधव भंडारी व शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाथरे परिसरातील सर्व दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आली होती. यावेळी समृध्दी महामार्गास जमीन देण्यास कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी प्रकाश दवंगे, पाथरे बुद्रुकचे सरपंच मच्छिंद्र चिने, भाऊसाहेब नरोडे, डॉ. संदीप गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, संदीप बूब, अमोल दवंगे, मधुकर निकम, बाळासाहेब घुमरे, संतोष बारहाते यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संदीप ढवण, भाऊसाहेब नरोडे, भाऊसाहेब चिने, पप्पू गुंजाळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, सोमनाथ घोलप यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायगाव खोऱ्यात संपाला प्रतिसादनायगाव : शेतकरी वर्गाने पहिल्यांदाच संपावर जाण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाला नायगाव खोऱ्यातील सर्व सात गावांनी शंभर टक्के प्रतिसाद देत संपाला प्रारंभ केला. नायगाव ग्रामस्थांनी गावातील तीनही दूध संकलन केंद्रांवर सुमारे चार हजार लिटर दूध न देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला होता. दूध संकलन केंद्रचालकांनी स्वत:हून बंदला प्रतिसाद देत दूध संकलन केंद्र बंद ठेवले. शेतकऱ्यांनी भाजीपाला न विकता संपात सहभागी होण्याचे आवाहन केले जात होते. संपाच्या पहिल्याच दिवशी सकाळी बसस्थानक परिसरात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिवसभराची रणनीती ठरवित संप यशस्वी करण्यासाठी चर्चा केली. गावफेरी काढून संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. नायगाव खोऱ्यातील जायगाव, देशवंडी, ब्राह्मणवाडे, वडझिरे, सोनगिरी, जोगलटेंभी आदी गावांतील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रात दूध न घालता घरी ठेवले, तर काहींनी गावातच वितरित केले. शेतातील कांदापात, मेथी, कोथिंबीर, गवार, भेंडी आदी भाजीपाला विक्रीसाठी न काढल्याने शेतावर येणाऱ्या व्यापाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पांगरीत दूध संकलन केंद्र बंदपांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी येथे शेतकऱ्यांनी शंभर टक्के संपात सहभाग घेतला. जिल्ह्यातील सर्वाधिक दूध संकलन पांगरी येथे केले जाते. मात्र, सर्व दूध संकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. सिन्नर-शिर्डी रस्त्याने नाशिककडे जाणारी शेतमालाची वाहने शेतकऱ्यांनी अडवून त्यांना परत घेऊन जाण्याची विनंती केली. त्यानुसार वाहनचालकांनी वाहने परत नेली
सिन्नरमध्ये रस्त्यावर दूध ओतून निषेध
By admin | Published: June 02, 2017 12:11 AM