मुसळगाव : नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना सलग तिसरा महिना उलटूनही वेतन न मिळाल्याने शिक्षकांच्या दिवाळीवर संक्रांत आल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही वेतन वेळेवर न मिळाल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यापासून प्राथमिक शिक्षकांचे वेतन रखडले आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी मिळणारे आॅक्टोबर महिन्याचे वेतनही अद्याप न मिळाल्याने शिक्षकांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे. गृहकर्ज, विमा हप्ता, विविध सहकारी संस्थांचे हप्ते, मुलांचे शैक्षणिक खर्च, कौटुंबिक आजारपण यांसह अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य शासनाने शिक्षकांच्या वेतनासाठी आॅनलाइन शालार्थ वेतनप्रणालीचे काम गत सहा महिन्यांपासून हाती घेतले आहे. शिक्षकांनी सर्व माहिती अद्यावत करून शिक्षण विभागाकडे सुपूर्द केली आहे. याकामी शिक्षकांकडून काही पैसे उकळल्याचीही चर्चा आहे. तरीही वेतन रखडल्याने शिक्षकांची कुचंबणा होत असल्याचे चित्र आहे. विविध शिक्षक संघटनांनी लेखी व तोंडी निवेदन सादर करुनही कार्यवाही झालेली नाही. दोन महिन्यांपूर्वी महसूल आयुक्त एकनाथ दवले व मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी हस्तक्षेप केल्यानंतर वेतन सुरळीत झाले होते. तरीही पुन्हा एकदा तिच स्थिती उद्भवल्याने शिक्षक अडचणीत सापडला आहे. दिवाळी सण तोंडावर आला असतानाही तीन महिन्यांचे वेतन रखडल्याने शिक्षकांवर संक्रांत आल्याचे चित्र आहे. शिक्षकांचे रखडलेले वेतन तातडीने अदा करण्याची मागणी श्रावण वाघ, चिंधू वाघ, धनराज भदाळे, शशिकांत अमृतकर, अशोक शिवदे, राजेंद्र शेजवळ, प्रकाश जगताप, ललित सोनवणे, आशालता फलके, संगीता मुंडे, मनीषा जाधव, पंडित मांगते, बलराम राजपूत, मुख्याध्यापक भास्कर ठाकरे, अलका आहेर, किसन दराडे, राजेश सांगळे, संदीप काकड, सोमनाथ वाळुंज, रंगनाथ कातकाडे, रामदास सांगळे, शांताराम सांगळे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)