लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : निवडणूक कर्तव्यावर असताना शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याला यापूर्वी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत शासनाने दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
या संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केले असून, निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना कर्मचारी अथवा अधिकारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसांना यापुढे दहा लाख रुपये मदत दिली जाणार आहे. पूर्वी ही रक्कम पाच लाख रुपये इतकी होती. निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना अतिरेकी कारवाया, नक्षलवाद्यांच्या कारवाया यात बॉम्बस्फोट, सुरूंग पेरणी वा शस्त्रास्त्रांचा हल्ला होऊन त्यात अधिकारी, कर्मचारी मृत झाल्यास त्यांच्या वारसांना वीस लाख रुपये मदत दिली जाणार आहे. पूर्वी दहा लाख रुपये इतकी होती. निवडणुकीचे काम करीत असताना एखाद्या दुर्घटनेमुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या अधिकारी, कर्मचा-यास पाच लाख रुपये दिले जाणार आहे. यापूर्वी अडीच लाख रुपये दिले जात होते. अतिरेकी कारवायात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास यापुढे दहा लाख रुपये दिले जाणार आहे. पूर्वी ही मदत पाच लाखापुरती मर्यादित होती.