नाशिक : शहरात गेल्या ३६ तासांपासून सलग सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (दि. ११) दुपारनंतर काही वेळ विश्रांती घेतली. मात्र दुपारनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत १८९९ मिलिमीटर पाऊस झाला असून, त्याची सरासरी १२६ मिलिमीटर इतकी आहे. जिल्ह्यात जुलै महिन्यातील पावसाची सरासरी १५४ असताना प्रत्यक्षात यावर्षी आतापर्यंत ३५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी याच कालावधीत १६६ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली होती.रविवारी गोदावरी नदीत २२ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. इगतपुरी येथील तरंगपाडा पिंप्री येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या २० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात ६१ टक्के, बागलाण तालुक्यात ५४, सिन्नर ५१, तालुक्यात सर्वांत कमी पावसाची नोंद मालेगाव २२.५ आणि पेठ येथे २५.५ टक्के झाली आहे. जिल्ह्णात एकूण ३२.८७ टक्के पावसाची नोेंद करण्यात आली आहे. संततधारेमुळे धरणाच्या पाणीसाठ्यातदेखील लक्षणीय वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ४७ टक्के, तर दारणा धरणात ६६ टक्के पाणीसाठा सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत झाला होता. पालखेडमध्ये ७७ टक्के पाणीसाठा झाला असून १९ हजार ५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणातून ९१७५ तर नांदूरमधमेश्वरमधून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय गोदावरी डावा व उजव्या कालव्यातून प्रत्येकी १५० क्यूसेक पाणी सोडले आहे. पालखेड डाव्या कालव्यातून ६०० क्यूसेक पाणी सोडले आहे. त्याचा फायदा मनमाड, मनमाड रेल्वे, येवला नगरपालिका आणि ३८ गावे पाणीपुरवठा योजनेस होणार आहे. जिल्ह्णातील सर्व धरणांत प्रकल्प क्षमतेच्या २४ टक्के पाणीसाठा झाला आहे. सोमवारी सकाळनंतरही पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे बोलले जाते. दुपारनंतर पावसाने काही वेळ उघडीप घेतली. दोन वाजेनंतर पावसाची अधूनमधून संततधार सुरूच होती. (प्रतिनिधी)
मागील वर्षाच्या दुप्पट पावसाची हजेरी
By admin | Published: July 12, 2016 12:12 AM