नाशिक : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नाशिक व जिल्हा परिषद, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ई-साहित्य (ई-कन्टेंट)केबल टीव्हीच्या माध्यमातून दोन लाख घरांपर्यंत शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करून विद्यार्थी व शिक्षकांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे.जिल्ह्यातील तंत्रस्नेही शिक्षकांना प्रेरित करून त्यांच्या माध्यमातून कोरोना कालावधीत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ई-कन्टेंट निर्माण करण्यात आले. जिल्हा शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता व कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक योगेश सोनवणे यांनी जिल्ह्यातील केबलचालकांसोबत समन्वय करून ई-कन्टेंट प्रसारण करण्यासाठी विनंती केली. या आवाहनाला प्रतिसाद देत केबलचालकांनी ई-कन्टेंट प्रसारण केले. यासाठी ई-बालभारती दीक्षा ॲप, डिजिटल साक्षर, शैक्षणिक यू-ट्यूब चॅनल या संसाधनांचा प्रभावीपणे वापर करून प्रथम व द्वितीय सत्रसाठी आवश्यक ई-साहित्य तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने करून घेण्यात आले. हे साहित्य केबल टीव्हीच्या माध्यमातून वापरून संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कार्यक्रम प्रसारित करण्यात आले. याचा फायदा जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी, पालक, शिक्षकांना झाला. त्यामुळे या काळात शाळा जरी बंद असली तरी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थी शिकू लागल्याने या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले.
कोरोना काळात ई-कन्टेंटद्वारे दोन लाख कुटुंबांतील विद्यार्थी सामावले शिक्षण प्रवाहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 1:08 AM