दारणाकाठ : पळसे गावात पहाटे बिबट्याचा बछडा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:58 AM2020-07-21T09:58:32+5:302020-07-21T10:01:27+5:30
सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले
नाशिक : दारणा नदीकाठालगत सातत्याने वनविभागाकडून विविध गावांमध्ये बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू असून वनविभागाने पळसे गावात लावलेल्या एका पिंजऱ्यात आज सोमवारी (दि.२१) पहाटे दीड ते दोन वर्षे वयाचा बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना जेरबंद झाला. वीस दिवसांत हा तीसरा बिबट्या जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे. आठवडाभरापुर्वीच सामनगावात बिबट्या जेरबंद झाला होता.
दारणानदीच्या खो-यालगत असलेल्या विविध पंचक्रोशीमध्ये ऊसशेतीचे विस्तीर्ण क्षेत्र आहे. या क्षेत्रात मोठ्या संख्येने बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. या भागात सुमारे पंधरा ते वीस बिबटे असण्याची शक्यता वनविभागाकडूनच काही दिवसांपुर्वी वर्तविण्यात आली होती. दरम्यान, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये संतोष गायधनी यांच्या शेतीच्या गट क्रमांक ३५९मध्ये लावण्यात आलेल्या पिंज-यात पहाटेच्या सुमारास वयात येणारा बिबट्या जेरबंद झाला. सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलीस पाटील सुनील गायधनी यांना माहिती दिली. तत्काळ गायधनी यांनी वनविभागाला याबाबत सुचना दिली. माहिती मिळताच वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे, इको-एको संस्थेचे वन्यजीवप्रेमी वैभव भोगले, वाहनचालक प्रवीण राठोड, सुनील खानझोडे यांनी घटनास्थळ गाठले. तत्क ाळ जेरबंद झालेला बिबट्याचा पिंजरा वन्यप्राणी रेस्क्यू व्हॅनमधून सुरक्षित ठिकाणी हलविला. या बिबट्याची वैद्यकिय तपासणी करण्यात येणार असून बिबट्या प्रथमदर्शनी सुदृढ असल्याचे वनअधिकाºयांनी सांगितले. सध्या वनविभागाकडून या बिबट्याला पाहुणाचार दिला जात आहे. पुढील दोन दिवसांत या बिबट्याचीसुध्दा बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात रवानगी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वीस दिवसांत तीन बिबटे पिंज-यात
या वीस दिवसांत दारणाकाठालगतच्या जाखोरी, सामनगाव आणि पळसे या तीन गावांमध्ये लावलेल्या पिंजºयात प्रत्येकी एक याप्रमाणे तीन बिबटे जेरबंद झाले. जाखोरी गावात बिबट्याची प्रौढ मादी तर सामनगावात नर आणि पळसेमध्ये वयात येणारा लहान नर बिबट्या जेरबंद झाला. बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, कोटमगाव, शेवगेदारणा, चाडेगाव या भागात पिंजरे, ट्रॅप कॅमेरे अद्यापही कायम आहेत.