नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघात दुपारपर्यंत मतदारांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याने १ वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी २३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली. पूर्व विधानसभा मतदारसंघात चार ठिकाणी मतदारयंत्रांत बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या. त्यातील तीन यंत्रे दहा ते वीस मिनिटांच्या अंतराने सुरू झाली.सकाळी सात वाजेपासूनच मतदान सुरू झाल्याने काही सुशिक्षित मतदारांनी पंचवटीतील आर. पी. विद्यालयात मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या, तर नजीकच्या श्रीराम विद्यालयात रांगा नसल्या तरी मतदारांची रेलचेल सुरूच होती. या दोन्ही ठिकाणी सकाळी ११ पर्यंत सरासरी ८.७७ टक्के मतदान झाले होते. श्रीराम विद्यालयातील चार मतदान केंद्रांवर अनुक्रमे १२४१ पैकी १७७, ११३२ पैकी १३३, १२४८ पैकी १९६ व १५०० पैकी १७६, तसेच आर. पी. विद्यालयात १०८७ पैकी १५५, ९४६ पैकी १६१ असे मतदान झाले होते. तीच बाब दुपारपर्यंत मखमलाबाद येथे पाहावयास मिळाली. येथील जनता विद्यालयातील मतदान केंद्रावर ४३० पैकी १३७, १२३३ पैकी १७९, १४६८ पैकी २४२ असे एकूण सरासरी १४.६८ टक्के मतदान दुपारी १२ वाजेपर्यंत झाले होते. त्यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी २३ टक्के मतदान पूर्व विधानसभा मतदारसंघात झाले. वाल्मीकनगर परिसरात मतदारांमध्ये उत्साह होता; मात्र हा उत्साह बूथवर जाईपर्यंत होता. काही मतदार मतदान न करताच परतत असल्याचे चित्र होते, तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात मतदान सुरू झाले होते. फुलेनगर व दत्तनगर परिसरात मतदार मत‘दाना’ची वाट पाहत बसल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)