चार महिने खा फक्त मक्याची रोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 08:13 PM2018-02-05T20:13:38+5:302018-02-05T20:15:33+5:30
गेल्या वर्षी शासनाने खरेदी केलेला मका यंदा सडू लागताच त्याची रेशनमधून एक रुपया किलोप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला. गेल्या वर्षी जवळपास ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्या मक्याची डिसेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना विक्री करण्यात आली.
नाशिक : मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने आधारभूत किमतीत शेतक-यांकडून मका खरेदी करणे सुरूच ठेवले असून, नाशिक जिल्ह्यातून अंदाजे दीड लाख क्विंटल मका खरेदी होण्याची अंदाज वर्तविला जात असताना हा संपूर्ण मका रेशनमधून शिधापत्रिकाधारकांना वाटण्याचे शासनाचे आदेश असल्याने आगामी चार महिने गोरगरिबांना मक्याच्या रोटीवरच गुजराण करावी लागणार आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील नागरिक जेवणात मका खात नसल्याचे माहिती असूनही सरकारने त्यासाठी जबरदस्ती चालविली आहे.
गेल्या वर्षी शासनाने खरेदी केलेला मका यंदा सडू लागताच त्याची रेशनमधून एक रुपया किलोप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला. गेल्या वर्षी जवळपास ३८ हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आला. त्या मक्याची डिसेंबर महिन्यात शिधापत्रिकाधारकांना विक्री करण्यात आली. परंतु डिसेंबरमध्ये पुन्हा राज्यात आधारभूत किमतीत मका खरेदी करण्याचे धोरण स्वीकारून प्रतिक्विंटल १४२५ रुपये दराने खरेदी करत असलेला मका शासनाने रेशनमधून एक रुपया दरानेच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारीअखेर सुमारे ८६ हजार क्विंटल मक्याची आधारभूत खरेदी केंद्रांद्वारे खरेदी केली असून, नवीन मकादेखील शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना दरमहा देण्यात येणा-या गव्हाच्या धान्यात कपात करण्यात आली आहे.
यंदा नाशिक जिल्ह्यात जवळपास दीड लाख क्विंटल मका खरेदी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची संख्या लक्षात घेता दरमहा ३७ हजार क्विंटल मक्याचे वाटप केले जाणार आहे. त्याची सुरुवात फेब्रुवारीपासून झाली आहे. दरमहा ३७ हजार क्विंटलचा हिशेब केल्यास जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना आणखी चार महिने मका खावा लागणार आहे.