शाळांमध्ये पर्यावरणपूरक होळी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 12:17 AM2019-03-21T00:17:10+5:302019-03-21T00:17:27+5:30
शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली.
नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक होळी साजरी केली़ विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा व वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला़ तसेच होळी खेळताना नैसर्गिक व कोरड्या रंगांची होळी खेळून पाण्याची नासाडी टाळली. यावेळी पाणी बचतीचा संदेश देण्यात आला़
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या आदर्श शिशुविहार व वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर, गंगापूररोड या शाळेत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला़ शाळेच्या मुख्याध्यापिका पुष्पा लांडगे व ज्येष्ठ शिक्षिका रंजना घुले यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली़ तनुजा वाघ यांनी होळी सणाबद्दल माहिती सांगितली़ शाळेतील संगीत शिक्षक शेवाळे व विद्यार्थ्यांनी होळी सणाची गाणी सादर केली़ शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसरातील कचरा, पाला-पाचोळा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला व पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता व पाणी न वापरता नैसर्गिक कोरडा रंग वापरून इको फे्रंडली होळी साजरी केली़ यावेळी निसर्गाची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, अशी प्रतिज्ञा केली़
सदरच्या कार्यक्रमास अनिता हांडगे, राजश्री जाधव, विशाखा पवार, शकुंतला मोगल, अक्का आहेर, वैशाली रकिबे, कविता जाधव, मनीषा घोरपडे, तनुजा वाघ, तारामती बोनाटे, ललिता शिंदे आदी शिक्षक व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते़
वाल्मीकी टॉट्स शाळा
गंगापूर रोडवरील वाल्मीकी टॉट्स या शाळेमध्ये होळी सण आणि रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली़ यावेळी मुलांना होळी सणाची माहिती व महत्त्व सांगण्यात आले़ यावेळी पाण्याचा वापर टाळून कोरडे व नैसर्गिक रंग वापरण्यावर भर देण्यात आला़ तसेच मुलांना पाणीबचतीचा संदेश देण्यात आला़ यावेळी सिमांतिनी कोकाटे, सीमा कोकाटे उपस्थित होत्या़