शिक्षण विभाग भानामतीच्या चक्रात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:15 AM2021-09-03T04:15:35+5:302021-09-03T04:15:35+5:30
चार आठवडे उलटून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला, अद्याप त्या जागेवर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास शिक्षण ...
चार आठवडे उलटून माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार अतिरिक्त अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आला, अद्याप त्या जागेवर कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास शिक्षण विभागाला वेळ मिळाला नाही. एकतर सक्षम अधिकाऱ्यांची कमतरता असावी किंवा शिक्षण विभागाला वाटत असलेली कमतरता ‘भरून’ देण्याची सक्षमता दाखविण्यासाठी कोणी पुढे येत नसावे. त्यामुळे ही नियुक्ती रखडली. त्यातून शैक्षणिक नुकसान फारसे होत नसले तरी, शिक्षक-शिक्षकेतरांच्या वेतनावर गंडांतर मात्र निश्चित आले आहे. ते काम करण्यासाठी प्रभारी अधिकारी नेमले तर त्यांनी देखील माध्यमिक शिक्षण विभागातील दररोजच्या गैरप्रकार, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनी त्रस्त होऊन काम करण्यास नकार दिला आहे. तर, दुसरीकडे प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनीही एक महिन्याच्या दीर्घ मुदतीच्या रजेवर जाणे पसंद केले आहे. राज्य सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात असताना शिक्षणाधिकाऱ्याने रजेवर जाण्याचा निर्णय साहजिकच सहजासहजी घेतलेला नसावा, जर कठीण परिस्थितीत हा निर्णय घेतला असला तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याचा कारभारही प्रभारीकडे देण्यात येईल.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ग्रहण लागल्यागत परिस्थिती सध्या दिसू लागली आहे, हे भावी पिढीच्या दृष्टीने घातक ठरू शकते. मात्र, इतका गंभीर विचार करण्याच्या भानगडीत ना प्रशासन पडेल, ना जिल्हा परिषदेचे कारभारी. त्यामुळे त्याचा विचार भावी पिढीवर अवलंबून असलेले करतील. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी रजेवर जाण्यावरून जी काही चर्चा होत आहे, ती खचितच योग्य नाही. पंचायत राज समितीने शिक्षण विभागाचे पुराव्यासकट काढलेले वाभाडे व त्यातून प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहण्याची नामुष्की ओढवली. शिक्षण विभागातच हे घडते असे नाही, प्रत्येक विभागातीलच कर्मचारी, अधिकारी मुख्यालयी राहतात असे नाही, काहींचे मुख्यालयी राहून कार्यालयात शासकीय कामकाज करणे अपेक्षित असताना महिनोन्महिने कार्यालयाचे तोंडही न पाहणारेही अनेक आहेत. मात्र असे महाभाग आजवर कधीच समोर आले नाहीत, किंबहुना त्यांना उघडे पाडण्याचा प्रयत्न झाला नाही. शिक्षणाधिकाऱ्यांनी जरा अधिकच ती बाब मनावर घेतली. परिणामी त्यांना रजेवर जाण्यास भाग पडावे लागले. एखाद्या भानामतीने भारावून टाकावे, तसा शिक्षण विभागावर काळी जादू झाल्यागत गेल्या महिन्यापासून परिस्थिती ओढवली आहे. श्रावण महिना तसाही धार्मिकदृष्ट्या पवित्र व महत्त्वाचा मानला गेला आहे, त्यातच हे सारे व्हावे, तसे अनाकलनीयच.
-श्याम बागुल