साने गुरुजींना अभिप्रेत असलेले शैक्षणिक कार्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:13 AM2021-03-15T04:13:59+5:302021-03-15T04:13:59+5:30
नाशिक : माजी मुख्याध्यापिका कुमुदिनी फेगडे यांनी साने गुरुजी यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम आपल्या लेखनातून केले, त्यांनी लिहिलेल्या ...
नाशिक : माजी मुख्याध्यापिका कुमुदिनी फेगडे यांनी साने गुरुजी यांना अभिप्रेत असलेले शैक्षणिक काम आपल्या लेखनातून केले, त्यांनी लिहिलेल्या ‘एकांकी पुष्प’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुकुलातील बालकांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे एकप्रकारे आजीच्या पुस्तकाचे प्रकाशन नातवंडांच्या हस्ते करण्यात आल्याची भावना यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर बोऱ्हाडे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी छोट्या शिशु गटातील मुला - मुलींना खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. श्रीमती कुमुदिनी फेगडे या माजी मुख्याध्यापिका असून, सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गुरुकुलातील विद्यार्थ्यांसाठी लेखन केले आहे. त्यांच्या लेखनात कल्पनाविस्तारापेक्षा संस्कार आणि कृती यांना महत्त्व दिलेले आहे, असे निरीक्षण प्रा. बोऱ्हाडे यांनी नोंदविले. मनातील भावभावना पुस्तक रुपातून प्रत्यक्ष साकारल्याबाबत फेगडे यांनी समाधान व्यक्त केले. नाशिक शहरात पुस्तक प्रकाशनाचे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून अनेक मान्यवर उपस्थित असतात. रेषा गुरुकुलाने मात्र आपल्या गुरुकुलातील शिशु गटातील विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांचा दर्जा देऊन त्यांच्या हस्ते 'एकांकी पुष्प' या पुस्तकाचे प्रकाशन घडवून आणले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेखा बोंडे यांनी केले. युगा कुलकर्णी हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला पुस्तकप्रेमी, पालक व शिक्षक उपस्थित होते. कोरोना संबंधातील नियमांचे काटेकोर पालन करून हा समारंभ पार पडला.
फोटो
१४फेगडे
एकांकी पुष्प या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बालकांसह शंकर बोऱ्हाडे, कुमुदिनी फेगडे, मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.