सेंद्रिय पद्धतीने घेतले भरघोस डाळिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:25 AM2018-01-25T00:25:36+5:302018-01-25T00:26:00+5:30
जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे.
गोरख घुसळे
जिरायत शेती, पारंपरिक पिकांचा वर्षानुवर्षे पगडा, उत्पादन कमी अन् खर्च अधिक अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजन करून व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत येवला तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील ज्ञानेश्वर महाले व आनंदराव महाले या पितापुत्रांनी कृषी अधिकाºयांच्या मार्गदर्शनातून सेंद्रिय पद्धतीने दीड एकर डाळिंब बागाची जोपासना करून भरपूर उत्पन्न घेत वर्षाकाठी सात ते आठ लाखाचा निव्वळ नफा कमवून परिसरातील शेतकºयांपुढे नवा पर्याय उभा केला आहे. आनंदराव महाले यांनी २०१० मध्ये आपल्या शेतात दीड एकर सेंद्र्या जातीच्या डाळिंब बागाची लागवड केली. त्यात सुमारे ४५० झाडे आहेत. त्यापूर्वी महाले आपल्या शेतात हंगामी पिके घेत असत. डाळिंबबाग लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाले यांनी कृषी अधिकारी हितेंद्र पगार यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून ही सेंद्रिय पद्धतीची बाग उभी राहिली. दोन वर्षानंतर प्रत्यक्ष उत्पन्न सुरू झाले. पहिल्यावर्षी खर्च वजा जाता दोन लाख, दुसºया वर्षी तीन लाख, तिसºया वर्षी तीन लाख, चौथ्या वर्षी एक लाख, पाचव्या वर्षी पाच लाख असा नफा महाले यांना झाला आहे. मागील वर्षी परिसरातील शेकडो एकर डाळिंबबागांवर तेल्या रोगाचे अतिक्रमण झाल्याने परिसरातील शेतकºयांनी बागा तोडून टाकल्या आहे. मात्र अशाही परिस्थितीत महाले यांनी जैविक खते, गोमूत्र, जीव अमृत यांची फवारणी करून बाग सुस्थितीत ठेवून खर्च वजा जाता एक लाखाचा नफा मिळवला आहे. महाले हे आपल्या दीड एकर डाळिंबबागेसाठी सुमारे १५ शेणखत, जैविक खते, निंबोळी पेंड १५० किलो, जीव अमृत म्हणजेच शेणाची रबडी व गोमूत्र एकत्र करून दर पंधरा दिवसांनी झाडांना टाकले जाते. तसेच दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ यांची फवारणी केली जाते. यामुळे फळाची फुगवन होते. सुरुवातीस पानगळ करण्यासाठी दशपर्णी अर्क, गोमूत्र व गूळ नंतर बोर्डोची फवारणी दर पंधरा दिवसांनी केली. यामुळे तेल्या व बुरशीजन्य रोग नष्ट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे निमतेल, करंज तेल यांची दर पंधरा दिवसांनी फवारणी केली जाते. महाले हे मजुरांवर अवलंबून न राहता घरातील सदस्यांना सोबत घेऊन स्वत: कष्ट करीत आहेत. मागील वर्षी परिसरात भयाण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने बागेला पाणी देणे अवघड होऊन बसले होते. अशाही परिस्थितीत महाले यांनी सुमारे चार - पाच महिने सुमारे पंधरा - वीस किलोमीटरवरून विकत पाणी आणून बाग जगविली आहे.