सालाबादप्रमाणे यावर्षीही मुस्लीम बांधवांकडून पारंपरिक पध्दतीने उत्साहाच्या वातावरणात रमजान पर्व साजरा केला जात आहे. अबालवृध्दांकडून निर्जळी उपवास (रोजे) केले जात आहेत. तसेच मशिदींमध्ये मोजक्याच लोकांना परवानगी असल्याने समाजबांधवांकडून आपापल्या घरीच नमाज पठण, कुराण पठण केले जात आहे. उपवासांचे आकर्षण आणि कुतुहलापोटी शाळकरी मुलांकडूनसुद्धा कडक उन्हाळा असतानाही उपवास केले जात आहेत. यावरून रमजान पर्वचा उत्साह सहज लक्षात येतो. गेल्या वीस दिवसांपासून शहर व परिसरातील समाजबांधवांची दिनचर्या बदललेली पाहावयास मिळत आहे. पहाटेचा अल्पोपहार अर्थात ‘सहेरी’च्या विधीसाठी साखरझोप बाजूला ठेवून मुस्लीम मोहल्ले जागे होताना दिसून येतात. रमजानकाळात केल्या जाणाऱ्या उपवासांमध्ये सूर्योदयापूर्वीपासून तर सूर्यास्तापर्यंत पाणीसुध्दा वर्ज्य मानले जाते.
--इन्फो---
कोरोनामुक्तीसाठी घरोघरी ‘दुवा’
गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे सावट संपूर्ण रमजान पर्वावर कायम आहे. यामुळे नागरिकांचा काहीसा हिरमोड झाला आहे; मात्र प्रत्येक घराघरांतून कोरोनापासून देशाला तसेच संपूर्ण जगाला मुक्ती मिळो, अशीच प्रार्थना रमजानच्या पवित्र काळात होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. बाजारपेठा बंद राहत असल्यामुळे यावर्षीही ईदच्या खरेदीचा मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत. कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी यांसारख्या वस्तू खरेदी करता येणार नाहीत.
--इन्फो--
‘शिरखुर्मा’ वाढविणार ‘ईद’चा गोडवा
किराणा माल, सुकामेवा विक्रीच्या दुकानांना सकाळी अकरा वाजेपर्यंतच परवानी असल्यामुळे या दुकानांवर आता गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मुस्लीमबहुल भागात किराणा मालाच्या विक्रीच्या दुकानांची वेळ वाढविण्याची मागणी होत आहे, जेणेकरून नागरिकांची खरेदीसाठी सकाळच्या टप्प्यात झुंबड उडणार नाही आणि कोरोनाचा धोकाही वाढणार नाही. किराणा दुकानांची वेळ ईदपर्यंत वाढविल्यास दुकानदारांनाही सोशल डिस्टन्स राखणे शक्य होणार आहे. शिरखुर्मा हे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी साखर, तूप, खारीक, खोबऱ्यासह सर्व प्रकारचा सुकामेवा खरेदी करण्यावर मुस्लीम बांधव भर देतात. ‘शिरखुर्मा’ हे खाद्यपदार्थ ‘ईद’चा गोडवा वाढविणारे ठरते.