चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आठ सराईत गुन्हेगार तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:06 PM2020-12-16T16:06:32+5:302020-12-16T16:09:49+5:30
वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
नाशिक : शहरातील परिमंडळ-२मधील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सराईत गुन्हेगारांचा शोध घेत त्यांचा पुर्व इतिहास आणि गुन्ह्यांचा प्रकाराची चौकशी करत उपायुक्त विजय खरात यांनी चार पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकुण आठ गुन्हेगारांना तडीपार केले.
नाशिकरोड, उपनगर, सातपुर, अंबड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संघटित गुन्हेगारी डोके वर काढू लागल्याने पोलिसांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आणि गुन्हेगारांच्या टोळ्या फोडून काढण्याकरिता वारंवार कायदा सुव्यवस्थेला धोका पोहचविणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी तपासून तडीपार करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये खरात यांनी संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त झालेल्या गुन्हेगारांच्या प्रस्तावाची चौकशी करत त्यांच्या वर्तनात सुधारणा व्हावी, म्हणून नाशिकरोड येथील हुसेन फिरोज शेख (१८,रेल्वेकॉलनी, सिन्नरफाटा), गणेश उर्फ छकुल्या मधुकर वाघमारे (१९,रा. गायकवाड मळा), उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील पराग उर्फ गोट्या राजेंद्र गायधनी (२७, रा.नाशिकरोड), तसेच अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सतीश बबन माने (२३,रा.माउली चौक, अंबड), राजु उर्फ राजेश कचरु अढांगळे(३१,रा.इंदिरागांधी वसाहत, लेखानगर), अजय संजय आठवले (२५),अक्षय संजय आठवले (२१, रा. दोघे, शनि मंदिराजवळ शिवाजी चौक) आणि सातपुर येथील अजय महादु मोरे (२६,रा.अशोकनगर) या आठ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याची माहिती खरात यांनी दिली.
दरम्यान, वरील कोणताही गुन्हेगार परिसरात आढळून आल्यास नागरिकांनीसुध्दा 'साध्या वेशातील पोलीस' म्हणून जवळच्या पोलीस ठाण्यात त्याची माहिती द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.