सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर तवेरा जीपला अज्ञात वाहनाने हुल दिल्याने झालेल्या अपघातात आठ शाळकरी विद्यार्थीनी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडली. जखमी विद्यार्थीनी आगासखिंड येथील रहिवासी असून त्या पांढुर्ली येथील जनता विद्यालयात शिक्षण घेतात. जखमी विद्यार्थींनींना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.आगासखिंड येथून पांढुर्लीकडे जाणारी तवेरा जीप (क्र. एम. एच. ०४ ई. ४७५५) मध्ये बसून या विद्यार्थीनी सकाळी पांढुर्ली येथील जनता विद्यालयात जात होत्या. पांढुर्ली-आगासखिंड शिवारात असलेल्या कोळवहाळ नाल्याजवळ असलेल्या वळणावर अज्ञात सफेद रंगाच्या वाहनाने या तवेरा जीपला हुल दिली. त्यानंतर तवेरा जीप रस्त्याच्या कडेला नाल्यावर असलेल्या पुलाजवळून खाली कोसळली. जीप उलटून नाल्यात तीन ते चार फूट पाण्यात पडली.परिसरातील नागरिकांनी व वाहनचालकांनी मदत करुन तवेरा गाडीतील विद्यार्थींनींना तातडीने बाहेर काढून एसएमबीटी रुग्णालयात हलविले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या अपघातात मोनिका दिलीप फोकणे (१७), हर्षदा सुरेश बुरकुले (१७), शीला परशराम बेंडकोळी (१७), राणी सुरेश आरोटे (१७), प्रियंका नपू लहांगे (१७), श्रध्दा सुरेश बरकते (१७), आकांक्षा प्रकाश बरकते (१७), पूजा भाऊराव लहामगे (१७) सर्व रा. आगासखिंड ता. सिन्नर जखमी झाल्या. त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरु आहे.याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार विनोद टिळे अधिक तपास करीत आहेत.
जीप उलटून आठ विद्यार्थीनी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 6:43 PM