नाशिक: कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यापासून रखडलेल्या महापालिकेच्या सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुकांचा कार्यक्रम विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जाहीर केला आहे. येत्या १५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी सहाही प्रभाग सभापतीपदांच्या निवडणुका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येणार असून, मंगळवारी (दि. १३) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.नाशिक महापालिकेचे पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक रोड असे सहा प्रशासकीय विभाग आहेत. या प्रत्येक विभागाच्या कामकाजासाठी प्रभाग समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. या सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदाची मुदत गेल्या ३१ मार्च रोजी संपुष्टात आली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या नगरविकास विभागाने कोणत्याही सभेसाठी पाच पेक्षा अधिक सदस्यांना एकत्र बोलवता येऊ शकत नाही, असे कारण देत स्थायी समिती, विषय समित्याच्या सदस्य, सभापतीपदाच्या निवड प्रक्रियेला स्थगिती दिली होती. गेल्याच महिन्यात शासनाने या निवडणुकांवरील स्थगिती उठवली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रभाग सभापतीपदांसाठी निवडणुका घेण्याची परवानगी दिली असून, त्यामुळे महापालिकेच्या नगरसचिव विभागाने विभागीय महसुल आयुक्त गमे यांच्यांकडे प्रस्ताव पाठवून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती केली होती. त्यानुसार गमे यांनी सहाही सहाही प्रभाग समित्यांच्या सभापती पदांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. १५ आॅक्टोबर रोजी एकाच दिवशी सहाही प्रभाग समित्यांच्या सभापतीपदांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसठी मंगळवार, दि. १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नगरसचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रम-पंचवटी- सकाळी ११ ते दुपारी १२नाशिक पूर्व- दुपारी १२ ते १नवीन नाशिक- दुपारी २ ते ३नाशिकरोड- दुपारी ३ ते ४नाशिक पश्चिम- दुपारी ४ ते ५सातपूर- दुपारी ५ ते ५