लोकशाहीचा महन्मंगल उत्सव साजरा करण्याकरिता मतदानाला जाण्याचा आजचा दिवस. गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष व अपक्षांकडून केला जाणारा जो प्रचार आपल्या कानावर येऊन आदळत होता, त्यातील काय योग्य व काय अयोग्य याचा फैसला आज मतदाराला करावयाचा आहे. आपापले मुद्दे, आपापली भूमिका घेऊन सारे पक्ष व अपक्ष मतदारांपर्यंत पोहोचले. आता आज मतदाराची ‘बारी’ आहे, आपला कौल देण्याची. आपल्या लोकशाही प्रणालीत मतदाराला ‘राजा’ म्हणून जे गृहीत धरले आहे वा अपेक्षिले आहे, त्या ‘राजे’पणाचा अधिकार बजावण्याचा हा दिवस म्हणूनच अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे. यंदा या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रचंड राजकीय कोलाहल माजले होते. सारेच पक्ष स्वबळ अजमावित असल्याने त्यांनी ताकद पणास लावली. त्यातून आरोप-प्रत्यारोपही घडून आलेत. प्रचाराने कोणती पातळी गाठली हेदेखील जनतेला पाहावयास मिळाले. अखेरच्या चरणात प्रत्येकानेच आपापले वचननामे, जाहीरनामे, दृष्टीपत्र वगैरे वगैरेही लोकांसमोर मांडले. आता यापैकी भरोसा कुणाचा बाळगायचा आणि जी आश्वासने दिलीत ती पूर्ण करण्याची क्षमता कुणात आहे, याचा निर्णय मतदारांना घ्यायचा आहे. विशेष म्हणजे समाजातील एक घटक हा नेहमी व्यवस्थेला दोष देण्यात धन्यता व समाधान मानत असतो. हे चांगले नाही, ते कामाचे नाही, कुणी धड नाही, अशी त्यांची नेहमीची कुरकुर असते. परंतु चांगले कोण आणि कुणाला संधी द्यायची याचा फैसला करायची वेळ येते तेव्हा हाच वर्ग घरात बसून राहण्याची भूमिका घेतो. प्रत्येक नागरिकाला मतदानाचा आपला पवित्र हक्क व कर्तव्य बजावता यावे म्हणून शासनातर्फे मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर केलेली असते. परंतु अनेक महाभाग ही सुटी पर्यटनासाठी कारणी लावतात. तेव्हा, प्रत्येकानेच आपापली जबाबदारी ओळखून व एक सुज्ञ नागरिक म्हणून या कर्तव्यपूर्तीला प्राधान्य द्यायला हवे. तसे जर आपण करणार नसू तर व्यवस्थेला दोष देण्याचाही अधिकार आपल्याला उरणार नाही. तेव्हा आपल्या हक्कांप्रती जागरूक राहत मतदान करायचेच, असा दृढनिश्चय आपण करू या आणि जे जे कुणी आपल्या संपर्कात असतील त्या साऱ्यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करू या. कारण, आजचे आपले एकेक मत हेच राज्यातील सत्तेचा व आपल्याही भविष्याचा फैसला करणारे ठरणार आहे. आपल्याला जो विकास हवा आहे, तो कोण साकारू शकेल याचा निर्णय या आपल्या मताने होणार आहे. हेच एक मत आपल्या लोकशाहीलाही बळकटी प्रदान करणार आहे. तेव्हा, कसल्याही आमिषाला व दडपणाला बळी न पडता किंवा काय होणार आहे आपल्या एका मताने असा विचार न करता, आज मतदान करून दीपावलीच्या दीपोत्सवापूर्वी लोकशाहीचा हा लोकोत्सव सारे मिळून साजरा करू या...- किरण अग्रवाल
निवडणूकनामा
By admin | Published: October 15, 2014 12:29 AM