रात्री बारा वाजेच्या आत निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:44 AM2021-01-08T04:44:34+5:302021-01-08T04:44:34+5:30
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे ...
नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र ऑनलाइन अपलोड करण्याची प्रक्रिया तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे नॉमिनेशनची प्रक्रिया रात्री ११.५५ पर्यंत ऑनलाइन करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे सोमवारी रात्री १२ वाजेच्या आत निवडणुकीची प्रक्रिया ऑनलाइन होऊ शकली. निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्याने रात्री उशिरापर्यंत तालुकापातळीवर ऑनलाइन अपलोडिंगची प्रक्रिया सुरू होती. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींसाठी यंदा उमेदवारांना ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागले. अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांची मुदत होती. मात्र पहिल्या चार दिवसांत केवळ साडेचार हजार ऑनलाइन अर्ज दाखल झाले होते. पाचव्या दिवसापासून अर्ज दाखल करण्याचा वेग वाढल्याने ऑनलाइन यंत्रणेवर ताण आला. त्यामुळे अनेकांना अर्ज दाखल करता आले नाहीत. सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्याने ऑनलाइन अर्ज दाखल केेेलेल्या उमेदवारांना मार्गदर्शनही मिळत नव्हते. याबाबतच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर त्यांनी निवडणुकीपासून इच्छुक वंचित राहू नयेत म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देऊन उमेदवारांचे अर्ज ऑफलाइन घेण्याचे आदेश दिले. ऑफलाइन अर्ज नंतर अपलोड करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या होत्या. त्यानुसार तालुक्यांमध्ये निवडणुका असलेल्या ठिकाणी अपलोडिंगचे काम सुरू होते.
अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत सुरू असलेली प्रक्रिया आणि न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे अर्ज दाखल करून घेण्याची वेळ संपत येत असल्याने यंत्रणेवरील कामाचा ताण वाढला होता. सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत अपलोडिंग पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. राज्यात नाशिकसह नागपूर, अमरावती, औरंगाबाद, कोकण, पुणे या सर्व ठिकाणी न्यायप्रविष्ट प्रकरणांच्या विनंतीमुळे ऑनलाइन नॉमिनेशनची प्रक्रिया सोमवारी रात्री २३.५५ पर्यंत सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे प्रशासकीय काम करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. आयोगाच्या आदेशानुसार उमेदवारी अर्ज मागे घेण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया रात्री १२ वाजेच्या आत पूर्ण करण्यात आल्या.