वीजमंडळाचा भोंगळ कारभार, मजुराचे वीज बिल ६९ हजार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 10:23 PM2021-04-07T22:23:00+5:302021-04-08T00:52:03+5:30
पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.
पिंपळगाव बसवंत : येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या एका मजुराला चक्क ६९ हजार रुपयांचे वीज बिल पाठवून महावितरण विभागाने ह्यझटकाह्ण दिला आहे. सदर मजुराने वीज बिलाची रक्कम न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने ते कुटुंब महिनाभरापासून मेणबत्तीच्या उजेडात जीवन जगत आहेत.
महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार थांबत नसून अव्वाच्या सव्वा बिल देण्याचे काम अजूनही सुरू आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाला चक्क ६९ हजारांचे वीज बिल दिल्यामुळे पुन्हा एकदा महावितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पिंपळगाव शहरातील उंबरखेड रोडवरील झोपडपट्टीत संतोष जाधव हे वास्तव्यास असून ते कांद्याच्या खळ्यावर प्रतिदिन २०० रुपये रोजंदारीने काम करतात. त्याच्यावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. वीज बिल आई पार्वतीबाई जाधव यांच्या नावाने असून त्यांच्या घरात एक ट्यूबलाइट, टीव्ही व पंखा या व्यतिरिक्त विजेचे कोणतेच उपकरण ते वापरत नाहीत. असे असताना महावितरण कंपनीने मार्चमध्ये तब्बल ६९ हजारांचे बिल पाठवून त्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे एवढे बिल आले कसे असा प्रश्न जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला असता वीज बिल भरल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. थकलेली रक्कम न दिल्याने त्यांच्या घराचा वीजपुरवठा महिनाभरापासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जाधव कुटुंब अंधारात असून मेणबत्तीच्या उजेडात ते राहत आहेत. त्यामुळे खंडित केलेले वीज कनेक्शन लवकर जोडून द्यावे व अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले वीज बिल रद्द करून नव्याने योग्य बिलाची आकारणी करावी, अशी मागणी जाधव परिवाराने केली आहे.
सदर कुटुंबाला शिवसेनेचे ग्रामीण उपजिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी भेट देऊन अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले बिल महावितरण कंपनीने रद्द करावे अन्यथा महावितरणला शिवसेनेच्या स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा दिला आहे.
पूर्वी दर महिन्याला सहाशे ते सातशे रुपये वीज बिल यायचे पण फेब्रुवारीत अचानक ६२ हजार रुपये बिल आले. ते न भरल्याने वीजपुरवठा खंडित केला. वीजपुरवठा बंद असतानाही त्या ६२ हजारात सात हजारांची भर टाकून पुन्हा मार्चमध्ये ६९ हजारांचे बिल आले. मागील लॉकडाऊनमुळे अगोदरच उत्पन्न घटले असताना अव्वाच्या सव्वा वीज बिल भरायचे कसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
- संतोष जाधव, वीज ग्राहक, पिंपळगाव
ज्या वीज ग्राहकांची तक्रार असेल त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी. त्यांच्या तक्रारीचे योग्य निवारण करण्यासाठी सदर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर करुन विभागाकडून त्यांना योग्य न्याय दिला जाईल.
- नितीन पगारे, सहायक अभियंता, महावितरण.