नाशिक : कोरोनाच्या महाभयंकर संकटानंतर तब्बल दीड वर्षाहून अधिक कालावधीनंतर शहरातील प्राथमिक शाळांमध्ये पुन्हा एकदा घंटा वाजणार असून, सोमवार (दि. १३) पासून प्राथमिक शाळा सुरू होणार असल्याने शाळांच्या परिसरात चिमुकल्यांचा किलबिलाट पाहायला मिळणार आहे.
राज्य शासनाने १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, नाशिकमध्ये स्थानिक प्रशासनाने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर गुरुवारी (दि. ९) शाळांसंदर्भात अंतिम निर्णय घेत सोमवारपासून (दि.१३) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी शासनाच्या परिपत्रकानुसार प्रतिबंधात्मक नियमांची व मार्गदर्शन सूचनांची अंमलबजावणी करीत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, शाळा सुरू करताना वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था करावी, शाळेत हात धुण्यासाठी व्यवस्था, थर्मामीटर, थर्मल स्कॅनर गन, पल्स ऑक्सिमीटर यासह जंतुनाशक, साबण आवश्यक वस्तू उपयोगात आणाव्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी डॉक्टरांनी प्रमाणित केल्यानंतरच शाळेत उपस्थित राहावे, वर्गखोली तसेच स्टाफ रूममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करण्यासोबतच शाळेच्या दर्शनी भागावर फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर यासंदर्भात मार्गदर्शक सूचना असणारे फलक प्रदर्शित करावे, शारीरिक अंतर राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणाऱ्या बाणांच्या खुणा दर्शविण्यात याव्यात. परिपाठ व इतर तत्सम कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शंभर टक्के लसीकरण करण्यात यावे अशा सूचनाही महापालिकेच्या शिक्षण विभागाने केल्या आहेत.
महापालिका क्षेत्रातील एकूण शाळा -५०४
महापालिकेच्या शाळा - १०१
विद्यार्थी - ११४४१
विद्यार्थिनी- ११९९९
शिक्षक - ७९९
---
खासगी शाळा -४०३
विद्यार्थी - ८८२५१
विद्यार्थिनी- ७३५८८
शिक्षक - ३९१५