अकरा प्राचीन संरक्षित वास्तू
By Admin | Published: August 30, 2016 12:05 AM2016-08-30T00:05:03+5:302016-08-30T00:22:38+5:30
पुरातत्व विभाग : त्र्यंबकेश्वर मंदिरासह हेमाडपंती गोंदेश्वर मंदिराचा समावेश
नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिर असो की अंजनेरीचे हेमाडपंती मंदिर, तसेच पाथर्डीच्या पांडवलेणीसह सिन्नरचे गोंदेश्वर हेमाडपंती महादेव मंदिर अशा नाशिक जिल्ह्यात एकूण अकरा संरक्षित वास्तूंचा ठेवा भारतीय पुरातत्व विभागाकडून जतन केला जात आहे.
ऐतिहासिक पुरातन संस्कृतीची ओळख करून देणारी स्मारके, वास्तू, वाडे, किल्ले, मंदिरे, जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, येवला तालुक्यात मंदिरे, लेणी संरक्षित वास्तू म्हणून पुरातत्व विभागाने घोषित केल्या आहेत. पुरातन ठेवा जतन करण्याची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाने स्वीकारली आहे. यामध्ये नाशिक तालुक्यातील अंजनेरी गावाच्या शिवारात असलेली हेमाडपंती मंदिरे, दिंडोरीच्या आंबेगावमधील पुरातन मंदिर, जुने नाशिकमधील जुनी मातीची गढी (काझी गढी), सिन्नरचे अय्येश्वर मंदिर, त्रिंगलवाडीमधील जैन लेणी, मालेगाव तालुक्यातील झोडगा येथील हेमाडपंती महादेव मंदिर या पुरातन वास्तूंचा समावेश आहे.
संरक्षित वास्तूंमध्ये समाविष्ट असलेली सर्व मंदिरे पुरातन व हेमाडपंती असून, त्यावरील दगडी कोरीव नक्षीकाम आणि स्थापत्यकला दुर्मीळ आहे. बारा जोतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराचीही स्थापत्यकला आकर्षक व लक्षवेधी आहे. संपूर्ण काळ्या पाषाणाचा वापर करून ही मंदिरे बांधण्यात आली आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने या वास्तूंचे संरक्षण करत त्यांचे जतन करण्यासाठी त्या संरक्षित वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत. राष्ट्राच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या पुरातन वास्तूंचा ठेवा जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून सदर वास्तू, स्मारके संरक्षित म्हणून जाहीर केली
जातात. संरक्षित स्मारकांचे सर्वेक्षण करून भारतीय पुरातत्व विभागाने त्या ठिकाणी निरीक्षण नोंदविले
आहे.
पांडवलेणीचीदेखील संरक्षण व देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी भारतीय पुरातत्व विभागाने घेतली असून, या ठिकाणी भारतीय प्रौढ नागरिकांकडून प्रत्येकी पंधरा रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. पांडवलेणीमध्ये पंधरा वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश मोफत असून, सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत लेणीमध्ये प्रवेश दिला जातो.