येवला तालुक्यात हुरडा पार्ट्यांना जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 10:24 PM2020-01-22T22:24:22+5:302020-01-23T00:16:02+5:30
अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.
येवला : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.
खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न असलं तरी आजकाल साखर वाढल्याने ज्वारी अधिक प्रिय वाटू लागली आहे. रब्बी हंगामातलं ज्वारीचे पीक जूनमध्ये लावलं जातं. थंडीच्या दिवसात साधारणपणे जानेवारीच्या सुमारास त्याची कणसं कोवळी आणि रसदार असतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन, तिथेच कणसे काढून त्याची पार्टी करायची मजा काही औरच आहे. कणीस भाजून त्यातले हिरवेगार दाणे काढून ते बोचणाºया थंडीत खाण्यात मजा असते.
हिवाळा चांगला सुरु झाला आहे. खेड्यावर हुरडा पार्ट्या सुरू झाल्या आहेत. त्यातून एक प्रकारे निसर्ग पर्यटन होतं. आजकाल काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे अर्थात हुरडा मिळत असला तरी जी मजा शेतात आहे ती घरात नाही. हुरड्याबरोबर शेंगदाणा, तीळ, खोबरे आणि लसूण अशा चटण्याही बरोबर घेतल्या जात आहे.
शेणाच्या गोवऱ्यांवर किंवा लाकडावर अथवा उसाच्या
खोडव्यावर ज्वारीची कणसे भाजली जातात. पट्टीचे हुरडा खाणारे
गरम कणीस थेट हातावर घेऊन, चोळून त्यातील चवदार दाणे बाहेर काढतात आणि त्याचा आस्वाद घेतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
ज्वारीमध्ये अधिक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आणि आपोआप आहारावर नियंत्रण येते. वजन कमी होऊन कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे. ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं. ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तिवर्धक असतं.