नाशिक : जिल्हा परिषदेच्या नियमित बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केलेली असताना, या बदल्यांचे वेळापत्रक आचारसंहिता संपल्यानंतरही पुन्हा रखडल्याचे समोर आले आहे. तर, दुसरीकडे कर्मचारी बदल्यांबाबत कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला असला तरी, या बदल्या झाल्याच पाहिजे, अशी भूमिका कर्मचारी वर्गाने घेतली आहे. त्यामुळे संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यातील परस्परविरोधी भूमिका समोर आल्या आहेत.जिल्हा परिषदेतील बदल्यांची कार्यवाही दरवर्षी मे अखेरपर्यंतच पूर्ण करण्याचे शासन आदेश आहेत. मात्र यंदा विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहितेमुळे नियमित बदली प्रक्रि या झालेली नाही. निवडणुकीच्या निकालानंतर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, प्रशासनाने शासनाकडे धाव घेत बदल्यांबाबत मार्गदर्शन मागविले होते. शासनाने आचारसंहिता संपुष्टात आल्यावर बदल्या करण्याचे सुचविल्याने आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासनाने बदल्यांची कार्यवाही सुरू करत, बदल्यांचे वेळापत्रक तयार करून अध्यक्षांच्या मान्यतेसाठी पाठविले. मात्र या वेळापत्रकास मान्यता मिळालेली नसल्याने ते रखडले असताना या बदल्यांना आता विविध संवर्गातील कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे. परंतु, कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी ही मागणी करत असताना प्रत्यक्षात काही कर्मचाºयांनी या बदल्या झाल्या पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली आहे.त्यामुळे सामान्य कर्मचारी व संघटनांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
जिल्हा परिषदेतील बदल्यांविषयी कर्मचाऱ्यांची परस्परविरोधी भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:35 AM