सीताफळ देताय आदिवासींना रोजगार
By admin | Published: October 11, 2014 10:33 PM2014-10-11T22:33:56+5:302014-10-11T22:33:56+5:30
सीताफळ देताय आदिवासींना रोजगार
खामखेडा : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या तिळवण किल्ल्यावरील सीताफळांच्या झाडांना यंदा चांगला बहर आला असून, आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून परिसरात चांगला पाऊस पडत असल्याने सीताफळाची झाडे फळांनी लगडली आहेत.
आरोग्यदायी सीताफळाला मागणीही वाढली असल्याने आदिवासीबांधव ही सीताफळे कळवण, सटाणा, मालेगाव येथे विक्रीस आणत आहेत.
तिळवण किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात सीताफळाची झाडे आहेत. ही सीताफळे खाण्यास अगदी गोड व चविष्ट असल्याने डोळा फुटलेली (पूर्ण पिकलेली) फळे तोडली जात आहेत. पाटीभर सीताफळांना १५० ते २०० रुपये भाव मिळत असून, खर्चवजा जाता आदिवासी बांधवांना चांगली कमाई मिळत आहे. दोनजणांची जोडी दिवसाला ४ ते ५ पाट्या सीताफळे तोडत असून, काही व्यापारी डोंगराच्या पायथ्याशी येऊन फळांची खरेदी करीत आहेत.
काहीजण गट करून भाड्याची गाडी ठरवून फळे मालेगाव, नाशिक आदि ठिकाणी विक्रीला नेत आहेत. मोठ्या आकाराच्या सीताफळांच्या क्रेटला ७०० ते ८०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. मजुरीचे काम नसताना अशाप्रकारे हंगामी फळांद्वारे आदिवासींना आपला प्रपंच चालविण्यास आर्थिक मदत मिळत आहे. (वार्ताहर)