घाटे यांच्या तबलावादनाने रसिक मंत्रमुग्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:38 AM2019-09-23T00:38:18+5:302019-09-23T00:38:34+5:30
उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे.
नाशिक : उठाण, पेशकार, कायदे, रेले, तुक डे, चलन चक्रदारांसह पंडित विजय घाटे यांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील स्वतंत्र वादनाने नाशिककर रसिक मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे.
गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी (दि.२२) ‘तबलाविष्कार २०१९’चे तिसरे पुष्प ख्यातनाम तबलावादक पंडित विजय घाटे यांच्या तबलाविष्काराने रंगले. तत्पूर्वी उद्योजक संजय देशमुख, भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता देशमुख, एन. बी. जाधव, रवींद्र जाधव आणि रघुवीर अधिकारी, नितीन पवार आणि भास भामरे यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने पुष्पाचा प्रारंभ झाल्यानंतर गौरव तांबे यांनी ताल त्रितालात स्वतंत्र तबलावादन सादर करताना पेशकार, कायदे, रेले, गत, तुकडे, चलन, चक्रदार वादनाचा आविष्कार सादर केला. त्यांना पुष्कराज भागवत यांनी साथसंगत केली. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाइगौडा यांनी कथक नृत्याविष्काराचे सादरीकरण केले. त्यांनी प्रारंभी गणेशवंदना सादर करतानाच ताल तीनतालात परंपरेनुसार थाट, आमद, परण, तोडे, तुकडे, तिहाई, चक्रदाराच्या कलाविष्काराने रसिकांची दाद मिळविली. त्यांना सुभाष दसककर, गायिका मधुरा बेळे यांच्यासह पढंत अदिती नाडगौडा-पानसे, सुजित काळे आदींनी साथसंगत केली. पंडित विजय घाटे यांच्या ताल त्रितालातील वादनाने तबालभिषेक सोहळ्याचा समारोप झाला. त्यांना अभिषेक शिनकर यांनी साथसंगत केली. सुनेत्रा मांडवगणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.