अजून एक छदामही मिळालेला नाही
आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ तो मूकबधिर आहे. आम्हा तिघींचेही लग्न झालेले असून, दोघी बहिणी परजिल्ह्यात राहात असल्याने आईला मीच सांभाळत होते. आई आम्हा सर्वांनाच खूप जीव लावत असे. त्या दुर्दैवी घटनेत आईला प्राण गमवावा लागला. शासनाने मदत जाहीर केली असली तरी आम्हाला अजून छदामही मिळालेला नाही. विचारणा केली तर तुमची फाइल अजून आलेली नाही. अजून साहेबांची सही व्हायची आहे, अशी उत्तरे दिली जातात. दररोजच शासकीय कार्यालयांचे उबरठे झिजवत आहोत. - मनीषा पगारे, वत्सलाबाई सूर्यवंशी यांची मुलगी
..अन् आमच्या पायाखालची जमीन सरकली
त्यादिवशी सकाळच्या वेळी आम्ही दवाखान्यातच होतो. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक माणसांची पळापळ सुरू झाली. सुरुवातीला काय झाले हे काही समजत नव्हते. ऑक्सिजन गळती झाल्याचे समजले तेव्हा आमच्या पायाखालची जमीन सरकली, कारण आमच्या भावालाही ऑक्सिजन लावलेला होता. गळतीमुळे ऑक्सिजन न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. आजही तो प्रसंग जशाचा तसा डोळ्यासमोर उभा राहातो. तो आमच्या घरातील कर्ता पुरुष होता. त्याला तीन मुली आहेत. त्यांची जबाबदारी आता आमच्या वहिणीवर आहे. आज मुलींचे पितृछत्र हरपले आहे. आम्हाला राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत मिळाली आहे, मात्र मनपाकडून काहीही मिळालेले नाही. सध्या आम्ही बिहारमध्ये आहोत. - रंजन सहा, मासी सहा यांचे बंधू (फोटो एनएसकेवर)