‘सावाना’च्या फेरमतमोजणीला अखेर मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:48 AM2017-11-07T00:48:59+5:302017-11-07T00:49:09+5:30
सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ‘फेरमतमोजणी’ प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून, जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही फेरमतमोजणी प्रक्रिया आता मंगळवारी (दि. ७) होणार आहे.
नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक संस्थेच्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेल्या ‘फेरमतमोजणी’ प्रक्रियेला अखेर मुहूर्त लागला असून, जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही फेरमतमोजणी प्रक्रिया आता मंगळवारी (दि. ७) होणार आहे. सावानाच्या आगामी पाच वर्षांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल गेल्या एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आला होता आणि या निकालानुसार जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे आणि ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार बी. जी. वाघ यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होऊन धनंजय बेळे यांचा अवघ्या एका मताने विजय झाला होता. बी. जी. वाघ आणि धनंजय बेळे यांच्यात अवघ्या एकाच मताचा फरक असल्याने गं्रथमित्र पॅनलचे पराभूत उमेदवार बी. जी. वाघ यांनी निकाल जाहीर झाला त्याच दिवशी रात्री फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला होता; परंतु अनेक कारणांनी ही फे रमतमोजणी प्रक्रिया होऊ न शकल्याने या प्रक्रियेतला तिढा अधिकच वाढत गेला आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. जनस्थान पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार धनंजय बेळे यांनी फेरमतमोजणीला आव्हान देणारा अर्ज सहायक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे दाखल केला होता; परंतु फेरमतमोजणी हा निवडणूक प्रक्रियेचाच भाग असल्याने तसेच मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम कलमान्वये निवडणूकविषयक निर्देेश देण्याची तरतूद नसल्याने सहायक धर्मादाय आयुक्तांनी हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर दि. ३१ आॅक्टोबर रोजी फेरमतमोजणीला सुरुवात करण्यात आली होती; परंतु यावेळीदेखील धनंजय बेळे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाच्या निर्देशानुसार फेरमतमोजणीचे काम थांबविण्यात आले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नाशिकचे एस. एस. रास्ते यांनी मंगळवारी (दि. ६) जनस्थान पॅनलचे उमेदवार धनंजय बेळे यांचा अर्ज फेटाळून लावत फेरमतमोजणी प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी धनंजय बेळे यांच्यातर्फे अॅड. विनयराज तळेकर, सार्वजनिक वाचनालयातर्फे अॅड. अजय गर्गे यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यातर्फे अॅड. विलास लोणारी, तर ग्रंथमित्र पॅनलचे उमेदवार बी. जी. वाघ यांच्यातर्फे अॅड. दौलतराव घुमरे यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणी दोन्ही बाबींची चौकशी झाल्यानंतर न्यायालयाने निवडणूक अर्ज दिवाणी दावा
होऊ शकत नाही आणि निवडणुक ीसंबंधी निवडणूक अर्जात केलेल्या मागण्या निवडणूक प्रक्रिया संपलेली नसल्यामुळे फेरमतमोजणी स्थगित करण्याचा अर्ज कायदेशीर होऊ शकत नसल्याने हा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचा आदेश दिला असून, आता ही फेरमतमोजणी प्रक्रिया मंगळवारी (दि. ७) सकाळी ८ वाजेपासून सार्वजनिक वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात होणार असल्याची माहिती सावानाचे निवडणूक अधिकारी माधवराव भणगे यांनी दिली आहे.
न्यायालयाने सोमवारी दिलेल्या निकालावरून आता फेरमतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याने मंगळवारी (दि. ७) सकाळी ८ वाजेपासून फेरमतमोजणी प्रक्रियेला सुरुवात करणार आहे. फेरमतमोजणी प्रकरणी फक्त वाघ आणि बेळे या दोघांचेच अर्ज मला प्राप्त झाल्याने या दोघा उमेदवारांच्याच मतांची फेरमतमोजणी करण्यात येणार आहे. पाच ते सहा कर्मचाºयांच्या साहाय्याने योग्य ती दक्षता बाळगून फेरमतमोजणी प्रक्रिया पूर्ण करणार आहे. - माधवराव भणगे, निवडणूक निर्णय अधिकारी, सावाना
सोमवारी न्यायालयाने काय निकाल दिला याची प्रत मिळालेली नसल्याने निकालात न्यायालयाने काय म्हटले आहे हे माहिती नाही. फेरमतमोजणीनंतर आलेला निकाल मला मान्य असेल; परंतु घटनेप्रमाणे आणि कायदेशीर काम व्हावे यासाठी माझा पूर्वीपासूनच आग्रह आहे आणि यापुढेही राहील तसेच या प्रक्रियेप्रमाणे काम व्हावे यासाठी लढाई सुरू ठेवण्याची माझी तयारी आहे.
- धनंजय बेळे, उमेदवार (जनस्थान पॅनल)