शहरात आचारसंहितेची ऐशीतैशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 12:47 AM2019-09-23T00:47:55+5:302019-09-23T00:49:03+5:30
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे फलक लगोलग हटविले.
नाशिक : विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कोनशिला झाकण्यासह सत्ताधारी पक्षांचे छायाचित्र असलेल्या विविध सरकारी योजनांचे फलक लगोलग हटविले. मात्र शहरातील वेगवेगळ्या शासकीय इमारती आणि सार्वजनिक संस्थांच्या उद्घाटन आणि उपक्रमांच्या कोनशिला ‘जैसे थे’ आहे. ठिकठिकाणी विविध राजकीय पक्षांची चिन्हे आणि झेंडे अजूनही झळक त असल्याने आदर्श आचारसंहितेची ऐशी तैशी सुरू असून, प्रशासनाकडूनही आचारसंहितेच्या अंमलबजावणीला ढील दिली असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शनिवारी (दि.२१) दुपारपासून लागू झाल्यानंतर नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या शासकीय जाहिराती आणि फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. परंतु, निवडणूक विभागाने शहरातील दर्शनी भागाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी साधा दृष्टिक्षेपही टाकला नाही. त्यामुळे शहरातील जिल्हा शासकीय रुग्णालयातील अंधत्व निवारण नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया विभागाच्या इमारतीवरील कोनशिला, महापालिका नगरसेवकाचे नामोल्लेख असलेल्या पाट्या, खासदारांच्या संपर्क कार्यालयाचे फलक, त्र्यंबकरोडवरील तरणतलाव सिग्नल परिसरांतील झेंडे व पक्षचिन्ह, असे अनेक ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने हे फलक काढण्याविषयी किंवा ते झाकण्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही. राज्यात शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाल्याने शहरातील विविध राजकीय पक्षांचे फलक हटविण्यास सुरुवात झाली होती. पंरतु काही फलक अद्याप कायम असल्याने किती दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
असून, शहरातील विविध ठिकाणी अजूनही वेगवेगळ्या पक्ष व संघटनांचे चिन्ह असलेले फलक खुलेआम झळकत असल्याने आचारसंहितेचे नियम धाब्यावर बसविल्याचे दिसत आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेससारख्या राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर फलक लावले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यामुळे पक्षाचे झेंडे चौकाचौकांत लागले होते, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला समारोप सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फलकबाजी केली होती. यातील दर्शनी भागातील फलक प्रशासनाने काढले असले तरी काही ठिकाणचे झेंडे अद्यापही कायम आहेत.