युती झाली तरी दानवे विरूद्ध लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 06:56 PM2019-01-29T18:56:56+5:302019-01-29T18:57:35+5:30
भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज व घमेंड आली आहे, ही घमेंड उतरविण्यासाठीच आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज चढला असून, त्यांची नेते व पदाधिकाऱ्यांची वागणूक क्लेषदायक असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा माज उतरविण्यासाठी आपण जालना लोकसभा मतदार संघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याचा पुनरूच्चार शिवसेनेचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केला. भाजपा-सेनेची युती झाली तरी, पक्ष प्रमुखांकडून अनुमती घेवून लढणारच असा दावाही त्यांनी केला.
नाशिक येथे भरविण्यात आलेल्या कृषी महोत्सवाच्या समारोप सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अर्जुन खोतकर मंगळवारी नाशिक दौ-यावर आले असता प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढविण्याचा पुनरूच्चार करताना, कोणत्याही परिस्थितीत आपणच विजयी होणार असा दावाही त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाला सत्तेचा माज व घमेंड आली आहे, ही घमेंड उतरविण्यासाठीच आपण लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना भाजपाच्या युतीबाबत चर्चा होत असली व भाजपाने कितीही युतीसाठी पुढाकार घेतला तरी, सेनेचा अंतीम निर्णय पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हेच घेतील. परंतु युती झाली तरी, जालन्यातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी पक्षाची अनुमती घेवून रिंगणात उतरणारच असल्याचेही खोतकर यांनी सांगितले.