अखेर धाेकादायक वृक्षांचा अडथळा दूर होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:39+5:302021-06-16T04:19:39+5:30
गेल्या कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिक महापालिकेने अनेक रिंग रोड तयार केले आहेत. तसेच काही मार्गांचे रुंंदीकरणदेखील केले आहे. त्यात जेहान ...
गेल्या कुंभमेळ्याच्या दरम्यान नाशिक महापालिकेने अनेक रिंग रोड तयार केले आहेत. तसेच काही मार्गांचे रुंंदीकरणदेखील केले आहे. त्यात जेहान सर्कल ते गंगापूर या मार्गाचे रुंदीकरण करताना अनेक झाडे तोडावी लागणार असल्याने वाद निर्माण झाले होेते. काही पर्यावरणप्रेमींनी न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने सुरुवातीला स्थगिती दिल्याने अडचण निर्माण झाली होती. वृक्षतोडीसाठी विलास शिंदे आणि त्यांच्या समर्थनासाठी काही नागरिकांनी एकत्र येऊन गंगापूर रोड विकास समितीही स्थापन केली होती. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमी यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यानंतर हा विषय न्यायालयात गेल्यानंतर रस्त्याच्या मधोमध असलेली वड, पिंपळ, उंबर अशी देशी प्रजातीची झाडे वगळून अन्य झाडे तोडण्यास आणि त्या बदल्यात वृक्षारोपण करण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून गंगापूर रोडवर जेहान सर्कल ते गंगापूर गाव यादरम्यान असलेली झाडे ‘जैसे थे’ आहेत. या झाडांमुळे अपघात होत असल्याने ही झाडे हटवावी अथवा पुन:रोपण करावे, अशी मागणी विलास शिंदे यांनी केली होती. दरम्यान, नुकत्याच झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत गंगापूर रोड आणि दिंडोरी रोडवरील रस्त्याच्या मध्ये असलेल्या झाडांचे पुन:रोपण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मोठा प्रश्न सुटला असल्याचे विलास शिंदे यांचे म्हणणे आहे.
गंगापूर रोडवरील भोसला कॉलेज, कडलग मळा, गंगापूर गाव, सोमेश्वर धबधबा, गणेश मार्बल, साई हॉस्पिटल अशा अनेक ठिकाणचे धोकादायक वृक्ष हटविण्यात येणार असून त्यामुळे अपघात टळू शकतील, असे शिंदे यांनी सांगितले.
इन्फो...
पर्यावरणासाठी झाडे महत्त्वाची आहेत; परंतु रस्त्याच्या अत्यंत मध्यभागी असलेल्या गंगापूर रोडवरील झाडांमुळे अपघात होत होते. त्यामुळे नाशिक महापालिकेने वृक्ष स्थलांतरित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यात यश आले आहे. आता या मार्गावरील अपघात टळू शकतील.
- विलास शिंदे गटनेते, शिवसेना