देवमामलेदारांचा जीवनादर्श सर्वांनी घ्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:10+5:302021-02-05T05:50:10+5:30
येथील ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व नागरी ...
येथील ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या नूतनीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषिमंत्री दादा भुसे, खासदार सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले, देवमामलेदार यांच्यावर लिहिलेले पुस्तक सर्व भाषेत अद्ययावत करावे, जेणेकरून आजच्या पिढीला अर्थात अधिकार्यांना ते मार्गदर्शक ठरेल. येत्या महिन्यात मसुरी येथे होणार्या देशातील अधिकार्यांच्या कार्यशाळेत आपण देवमामलेदारांचा संदर्भ घेऊन मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. यशवंत महाराज यांचा शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श समोर ठेवल्यास देश घडविता येईल. जीवनात उंची गाठण्यासाठी हा सेवाभाव आवश्यक आहे. देवमामलेदारांच्या जीवनचरित्रावर आधारित लघुपट निर्मितीसाठी निधी देण्यासाठीही सहकार्य करण्यात येईल, असे कोश्यारी यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, आमदार जयकुमार रावल यांनीही मनोगत व्यक्त केले. नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजभवनाचे प्रधान सचिव संतोष कुमार, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, राजभवनाच्या उपसचिव श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, शंकरराव सावंत आदी उपस्थित होते.
दरम्यान, राज्यपालांनी देवमामलेदारांच्या मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. तत्पूर्वी राज्यपालांचे टाळ-मृदंगाच्या गजरात व पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले.
इन्फो
स्मारकाला देणार ‘ब’ दर्जा : भुजबळ
जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले, पुढील पन्नास वर्षांचा विचार करून देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारावे, त्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल. जनता संकटात असताना देवमामलेदार यांनी जनतेला साहाय्य केले. त्या काळातील ते मोठे धाडस होते. त्यांचे हे कार्य सामाजिक क्षेत्रात आणि शासकीय सेवेत असलेल्यांसाठी मोठे उदाहरण आहे. शासन निर्णयाचा उपयोग जनतेला होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी याची प्रेरणा देवमामलेदारांच्या स्मारकातून मिळते. या तीर्थस्थळाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
इन्फो
स्मारक जनसेवेचा आदर्श : दादा भुसे
कृषिमंत्री दादा भुसे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास जनता देवत्व प्रदान करते, हे दर्शविणारे देशपातळीवरील हे एकमात्र उदाहरण असल्याचे सांगितले. या स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास होईल. जनसेवेचा आदर्श म्हणून हे स्मारक ओळखले जाईल. शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सहकार्य करू, असे आश्वासन भुसे यांनी दिले.
इन्फो
...तर मी सर्वपक्षीय राज्यपाल!
कार्यक्रमात भुजबळ यांनी सुनील मोरे यांचा गौरव करताना सर्वपक्षीय नगराध्यक्ष असल्याचे म्हटले व सर्वपक्षीय असल्यामुळेच मोरे विकासकामे करू शकल्याचे अधोरेखित केले. कोश्यारी यांनीदेखील भुजबळ यांच्या सर्वपक्षीय विधानावर कोटी करत मोरे सर्वपक्षीय नगराध्यक्ष तर मी सर्वपक्षीय राज्यपाल आहे. भुजबळ हे बुजुर्ग नेते आहेत. त्यामुळे त्यांनीदेखील सर्वपक्षीय व्हावे, असे आवाहन केल्याने उपस्थितात हंशा पसरला.
फोटो कॅप्शन----
सटाणा येथे देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन करताना राज्यपाल भगतसिंह कोशारी. समवेत पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड आदींसह पदाधिकारी.
फोटो कॅप्शन ------
सटाणा येथे देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या स्मारकाच्या नूतनीकरण भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोशारी. व्यासपीठावर उपस्थित पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्ष सुनील मोरे, शंकरराव सावंत, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड आदी.
( छायाचित्र : दीपक सूर्यवंशी )