संतोषा, भागडी डेांगरावरील उत्खननास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:11 AM2021-06-23T04:11:30+5:302021-06-23T04:11:30+5:30
नाशिक : पर्यावरण संतुलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या पहिल्याच बैठकीत सारुळ शिवारातील संतोषा आणि भागडी डोंगरावरील अवैध उत्खननास ...
नाशिक : पर्यावरण संतुलनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सच्या पहिल्याच बैठकीत सारुळ शिवारातील संतोषा आणि भागडी डोंगरावरील अवैध उत्खननास बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे संकेत देखील देण्यात आले. दरम्यान, ब्रह्मगिरी येथील उत्खननाबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
पर्यावरणाचे संरक्षण तसेच विकासाची कामे यांचा योग्य समन्वय निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून, याबाबतची पहिलीच बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी बेलगाव ढगा व भागडी येथील डोंगरावरील उत्खनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बेलगाव ढगा ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच पर्यावरणप्रेमींनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबाबतचे अनेक मुद्दे मांडले. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील कागदपत्रांची तपासणी करून या दोन्ही डोंगरांवरील अवैध उत्खनन त्वरित बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. येथील उत्खनन थांबविण्यात यावे याबाबत अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. अखेर टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. संबंधितांवर दंडात्मक कारवाई तसेच वसुली करण्याबाबत देखील पडताळणी केली जाणार आहे.
या बैठकीत ब्रह्मगिरी डोंगर परिसरातील अवैध उत्खननाबाबत देखील चर्चा झाली. याबाबतच्या तपासणीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून, याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पर्यावरणाशी निगडित अनेक मुद्दे सदस्यांनी यावेळी मांडले.
--कोट--
२०१६ पासून येथील उत्खननाबाबतचा लढा सुरू होता. उत्खनन थांबविण्याबाबत सातत्याने ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता. सारुळ शिवारातील संतोषा व भागडी डोंगरावरील उत्खननाला बंदी घालण्यात आल्याने अनेक वर्षांचा लढा यशस्वी झाला आहे. पर्यावरणाचे रक्षण करणारा हा निर्णय आहे.
- दत्तू ढगे, सरपंच, बेलगाव ढगा
--इन्फो--
विविध समित्या स्थापन
टास्क फोर्सच्या बैठकीत पर्यावरणाशी निगडित अनेक घटक असल्याने या प्रत्येक घटकाची समिती स्थापन करण्यात आली आहे. गड-किल्ले, जल, वन्यप्राणी, पर्यावरण या विषयातील तज्ज्ञांना या समितीत स्थान देण्यात आले आहे.