ग्रामीण भागात सेटटॉप बॉक्सला मुदतवाढ
By Admin | Published: December 31, 2016 01:22 AM2016-12-31T01:22:49+5:302016-12-31T01:23:02+5:30
ग्राहक डिश टीव्हीकडे : कंपन्यांचा सेवा देण्यास नकार
नाशिक : दूरचित्रवाणीवर केबलद्वारे प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे डिजिटलायझेशन करण्याच्या अंतिम टप्प्याला ३१ मार्च २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे वृत्त असून, त्यामुळे ग्रामीण भागातील दूरचित्रवाणीधारकांना दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने चार वर्षांपासून डिजिटलायझेशन म्हणजेच दूरचित्रवाणीला सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याची सक्ती दूरचित्रवाणीधारकांना केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील प्रमुख महानगरांमध्ये त्याची सक्ती करण्यात आली, त्यानंतर टप्पाटप्प्याने संपूर्ण देशात ही मोहीम राबविण्यात येऊन शेवटच्या टप्प्यात ग्रामीण भागात सेटटॉप बसविण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ अंतिम मुदत देण्यात आली होती. डिसेंबर अखेर नागरिकांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेण्याबाबत वारंवार शासनाकडून तसेच केबल कंपन्यांकडून केले जात होते. ३१ डिसेंबर नंतर म्हणजेच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सेटटॉप बॉक्स न बसविलेल्या दूरचित्रवाहिन्यांवर कोणतेही कार्यक्रम प्रसारित होऊ शकणार नसल्याचेही सांगण्यात आल्याने, डिसेंबर महिन्यात जिल्ह्णातील ग्रामीण भागात राहणाऱ्या सहा लाख, ६३ हजार ९५१ कुटुंबीयांपैैकी केबल असलेल्या ३१ हजार ५९६ कुटुंबीयांनी तातडीने सेटटॉप बॉक्स बसविण्यास सुरुवात केली. डिसेंबर अखेर सोळा हजार ९१७ कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसवून घेतले असून, अजून ४७ टक्के कुटुंबीयांनी सेटटॉप बॉक्स बसविलेले नाहीत. सेटटॉप बॉक्स बसविण्यासंदर्भात देशभरात दूरचित्रवाहिन्यांचे उपग्रहाद्वारे कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवित ठिकठिकाणी न्यायालयात दावे दाखल केले आहेत, त्यावरील अंतिम सुनावणी अद्याप झालेली नाही. ३१ डिसेंबर २०१६ ही सेटटॉप बसविण्याची अंतिम मुदत देण्यात आल्याने या संदर्भात न्यायालयाने काही निर्णय दिल्यास त्यातून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. , शिवाय केंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना सेटटॉप बॉक्ससाठी आर्थिक चणचण भासत असल्याची बाब लक्षात घेऊन केंद्रीय प्रसारण खात्याने सेटटॉप बॉक्स बसविण्याला तीन महिन्यांची मुदत वाढवून देण्याचा निर्णय २३ डिसेंबर रोजीच घेतला आहे. तथापि, अद्याप या संदर्भात शासकीय यंत्रणेला कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत.