नाशिक: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन करताना वार्षिक निधीतून कोविड उपाययाजनेची शाश्वत कामे झाली पाहिजेत हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या क्षमतेपेक्षा तीनपट अधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केल्या आहेत.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील जिल्हा नियोजन निधीतून करण्यात आलेल्या कामांचा आढावा क्षीरसागर यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे, धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, नाशिक जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अहमदनगर जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, धुळे जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., अपर जिल्हाधिकारी जळगाव प्रवीण महाजन, उपायुक्त (नियोजन) प्रशांत पोतदार, उपायुक्त (महसूल) गोरक्ष गाडीलकर आणि जिल्ह्याचे नियोजन अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या अनुंषगाने बालकांसाठी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजना व नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेचा निधी खर्च करताना प्रथम प्राधान्य कोविडविषयक कामांना देण्यात यावे. कोविडची कामे करताना ती पुढील अनेक वर्षे होईल अशा स्वरुपाची विकासकामे जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून घेण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. बालकांसाठी आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन व इतर आवश्यक बाबींची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
--इन्फो--
ज्येष्ठांसाठी बाळासाहेब ठाकरे उद्यान स्मारक
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्यात उद्यान स्मारक उभे करून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी, व्यंगचित्र केंद्र, ओपन जिम, कलादालन, जिल्ह्यातील प्रसिध्द खाद्यपदार्थांचे स्टॉल अशा सर्व समावेशक बाबींचा समावेश करण्यात यावा. अशा उद्यान स्मारकाची विकासकामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करावीत, असे क्षीरसागर यांनी सुचविले.
220921\22nsk_49_22092021_13.jpg
नियोजन आढावा बैठकीत मार्गदर्शन करतांना राजेश क्षीरसागर