नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. काही गावांमध्ये त्याचा शेतीकामांवरही परिणाम झाला आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने कामे लांबली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे.
कोविड सेंटरमुळे दिलासा
नाशिक : निफाड तालुक्यातील तीनही ग्रामीण रुग्णालयांचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर करण्यात आले आहे यामुळे तालुक्यातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मात्र त्याचा ताण वाढला असल्याचे दिसून येत आहे.
अर्थकारणाला बसली खीळ
नाशिक : गावागावात भरणारे आठवडे बाजार गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला खीळ बसली आहे. बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांची उलाढाल पूर्णपणे मंदावली आहे.
महिलांना घरगुती रोजगार उपलब्ध
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे अनेक सेवाभावी संस्थांनी जेवण पुरविण्याचा उपक्रम सुरू केल्यामुळे महिलांना पोळी भाजी बनविण्याचे काम मिळाले आहे. त्यामुळे या महिलांना चांगली मदत झाली आहे. अनेक महिलांचे काम सुटल्यामुळे त्यांना घरीच थांबावे लागत आहे. या उपक्रमामुळे त्यांना रोजगार मिळू लागला आहे.
मजुरांना काम मिळणे झाले मुश्कील
नाशिक : कोरोनामुळे अनेक मजुरांना दररोजचे काम मिळणे मुश्कील झाले आहे. यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या मजुरांना रोजच्या कामाची चिंता सतावत आहे. आज काम मिळाले उद्या मिळेलच याची शास्वती नसल्याने त्यांना घरखर्च चालविणे अवघड झाले आहे.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम
नाशिक : दहावीची परीक्षा रद्द झाली असून बारावी परीक्षेबाबत काय निर्णय होतो याकडे अनेक विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही त्याचा परिणाम झाला आहे. या परीक्षेमुळे इतर परीक्षाही लांबल्या आहेत.
कर्मचाऱ्यांअभावी अनेकांची कामे रखडली
नाशिक : शासकीय कार्यालयामंध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थितीमुळे अनेक नागरिकांची कामे रखडली आहेत. कोरोनामुळे शासनाने कार्यालयांमध्ये कमी उपस्थितीचा नियम लावल्याने अनेक कर्मचारी घरीच असतात याचा कामकाजावर परिणाम झाला आहे.
दर वाढल्याने नियोजन कोलमडले
नाशिक : बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. कोरोनामुळे मजूरही अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्याने दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे बांधकाम व्यावसायिकांना शक्य होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक व्यावसायिक अडचणीत आले आहेत.