वसंत व्याख्यानमालेने ठरविली दातृत्वाची ‘एक्सपायरी डेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2015 12:09 AM2015-12-09T00:09:34+5:302015-12-09T00:09:53+5:30

कार्यकारिणीचा उपद्व्याप : दिवंगतांची थट्टा; तहहयात देणगीदारांकडून लक्ष रुपये उकळण्याचा डाव

'Expiry Date' of 'Dantavadha' by Vasant lecture | वसंत व्याख्यानमालेने ठरविली दातृत्वाची ‘एक्सपायरी डेट’

वसंत व्याख्यानमालेने ठरविली दातृत्वाची ‘एक्सपायरी डेट’

Next

नाशिक : औषधाला, प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाला ‘एक्सपायरी डेट’ असते. परंतु एखाद्या गोष्टीविषयी संवेदना, भावना जागृत ठेवून दिलेल्या दानावरही कुणी ‘मुदतबाह्य’ म्हणून शिक्का मारला तर अशा भावनाशून्य आणि संवेदना गमावून बसलेल्या लोकांबद्दल साहजिकच सात्त्विक संतापाचा उद्रेक होऊ शकतो. या दातृत्वाला ‘एक्सपायरी डेट’ लावण्याचा उपद्व्याप वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकारिणीने केला असून, गोदाघाटावर दरवर्षी मे महिन्यात होणाऱ्या ज्ञानयज्ञात स्मृती व्याख्यानमालेसाठी देणगी देणाऱ्या तहहयात दानशुरांकडे पुन्हा लक्ष रुपयांची गंगाजळी मागत कार्यकारिणीने दिवंगतांच्या स्मृतींची थट्टाच केली आहे.
वसंत व्याख्यानमालेच्या कारभारावर गेल्या काही वर्षांपासून जे काही शिंतोडे उडविले जात आहेत, त्याला एकप्रकारे कार्यकारिणीच्या अशा उपद्व्यापाने पुष्टीच मिळाली आहे. वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ दरवर्षी जसा नाशिक महापालिकेने दिलेल्या तीन लक्ष रुपयांच्या देणगीवर चालतो तसाच तो दानशुरांच्या दातृत्वावरही धगधगतो आहे. मे महिन्यातील संपूर्ण ३१ दिवस चालणाऱ्या ज्ञानयज्ञात प्रत्येक दिवशी शहरातील दिवंगत नामवंतांच्या नावाने स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते. अर्थात त्यासाठी संबंधित नामवंतांच्या कुटुंबीयांकडून मालेने १५ वर्षांपूर्वी मालेच्या ८०व्या वर्षी सुमारे १५ हजार रुपयांची ‘तहहयात’ देणगी स्वीकारलेली आहे. २००१ मध्ये ज्या ज्या तहहयात देणगीदारांनी देणग्या दिल्या त्यांच्या सन्मानार्थ मालेने ‘कायमस्वरूपी देणगीदार दिन’ ही संकल्पनाही राबविली. स्मृती व्याख्यानमालेत निश्चित केलेल्या तारखेला संबंधित दिवंगतांची प्रतिमा व्यासपीठावर ठेवली जाते, तिचे वक्त्यांच्या हातून पूजन केले जाते आणि याचवेळी दिवंगतांच्या कुटुंबीयातील सदस्यांना सन्मानाने व्यासपीठावर निमंत्रित करून त्यांना लघुवस्त्र-श्रीफळ व वृक्षरोपटे देऊन गौरविले जाते. मालेने व्यासपीठावर पार्श्वभागी दिवंगतांच्या नावाने त्या त्या तारखेला लावण्यात येणारे खास कापडी फलकही तयार करून घेतलेले आहेत. गेल्या १५ वर्षांपासून दिवंगतांच्या नावाने स्मृती व्याख्यानाचा हा उपक्रम सुरू आहे; परंतु खुर्चीत दीर्घकाळ बसल्यानंतर तिची ऊब हवीहवीशी वाटू लागते आणि तिचे नको ते गुणही आपोआप अंगात भिनले जातात, त्याचा प्रत्यय मालेच्या कार्यकारिणीबाबत येऊ लागला आहे.
१५ वर्षांपूर्वी ज्या देणगीदारांनी आपल्या कुटुंबीयातील दिवंगताच्या स्मृतिप्रीत्यर्थ मालेला देणगी रक्कम बहाल केली होती, त्या देणगीदारांना मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, चिटणीस प्रा. संगीता बाफणा आणि कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह यांच्या स्वाक्षरीनिशी एक पत्र दि. १९ नोव्हेंबरला पाठविण्यात आले आणि पत्राचा मायना पाहून देणगीदारांना धक्काच बसला. ‘देणगीची मुदत मे २०१५ मध्ये संपली आहे. मे २०१६ पासून देणगीचे नवीन स्वरूप ठेवण्यात येणार आहे.’ ही ओळ पाहून देणगीदारांची ‘हसावे की रडावे’ अशी अवस्था झाली. देणगीलाही ‘एक्सपायरी डेट’ असते याचा विदारक अनुभव देणगीदारांना आला. वास्तविक मालेचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनीच २००१ मध्ये सरचिटणीसपदी असताना देणगीदारांना त्यांच्या स्वाक्षरीनिशी पाठविलेल्या पत्रात ‘तहहयात देणगी’ असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तहहयात देणगीदार म्हणून स्मृती व्याख्यानासाठी एकदा देणगी स्वीकारलेली असताना सदर देणगीची मुदत कशी काय संपू शकते, असा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. कार्यकारिणीने नुसतेच पत्र पाठवून प्रमाद केला नाही, तर गेल्या २९ नोव्हेंबरला देणगीदारांची बैठक बोलावत पुढील १५ वर्षांकरिता स्मृती व्याख्यान योजनेत सहभागी होण्यासाठी देणगीचा भावही सातपट वाढवला आणि काही मासे गळालाही लावले. मुळात सन २००१ ते २०१५ अशी काही स्मृती व्याख्यान योजना होती काय आणि असेल तर त्याची कल्पना संबंधित देणगीदारांना त्याचवेळी का दिली नाही, अशाही प्रश्नांचा गोंधळ माजला आहे.
मालेच्या बॅँक खात्यात सध्या लक्षावधी रुपये पडून आहेत. मध्यंतरी मालेने महापालिका व शासनाच्या मदतीने मुंबई-आग्रा महामार्गावर उभारलेल्या वास्तूचाही उपयोग वेगळ्या कारणासाठी होत असल्याचा आरोप स्वीकृत नगरसेवक सचिन महाजन यांनी केला होता. मालेने दोन-तीन वर्षांपूर्वी दरमहा स्मृती व्याख्यानमालेसाठीही देणगीदारांना आवाहन केले होते. त्यातील एक-दोन व्याख्यान वगळता पुढे या योजनेचेही काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे. मालेच्या कारभाराबद्दल एकूणच संशयाचे मळभ दाटलेले असताना आणि मालेचेच काही पदाधिकारी त्यासाठी कोर्टबाज्या करत असताना मालेच्या कार्यकारिणीने आता थेट देणगीदारांनाच ‘हात’ घालत संशयाचे ढग आणखी गडद केले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Expiry Date' of 'Dantavadha' by Vasant lecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.