सफाई कामगारांचे शोषण
By admin | Published: April 6, 2017 12:40 AM2017-04-06T00:40:44+5:302017-04-06T00:41:18+5:30
मालेगाव :महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी कामगारांसंबंधीच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत.
मालेगाव : लाड व वी. स. पागे कमिटीच्या शिफारशींची मालेगाव मनपा प्रशासन अंमलबजावणी करीत नसल्याचा ठपका महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामूजी पवार यांनी ठेवीत कामगारांसंबंधीच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले आहेत. तसेच याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे.
राज्यातील महापालिकांमध्ये शासनाने सफाई व इतर कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या योजनांची व लाड व पागे कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी करण्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यानिमित्त पवार यांनी मालेगाव महापालिकेला भेट दिली होती.
प्रारंभी मनपाच्या सभागृहात अधिकारी, कर्मचारी, प्रमुख स्वच्छता निरीक्षक व विविध सफाई कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पवार पत्रकारांशी बोलत होते. पवार पुढे म्हणाले की, मालेगाव मनपात सफाई कामगारांची चुकीच्या पद्धतीने भरती होत आहे. वारसाहक्क नियुक्ती प्रक्रियेत वारसांना डावलले जात आहे. वाममार्गाने कर्मचारी भरती सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंबंधात मनपा आयुक्तांना निर्देश दिले आहेत. लाड व पागे कमिटीच्या शिफारशींची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अस्पृशता हटविण्याचे काम प्रभावीपणे केले जात नाही. सफाई कर्मचाऱ्यांशी व असंघटित कामगारांचे नाशिक व मालेगाव महापालिकेत शोषण होत असल्याची धक्कादायक बाबही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेस नरोत्तम चव्हाण, नरेश चव्हाण, राजेश सौदे, सुनिल चांगरे, बेद आदि पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)