नाशिक- राज्य शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतरदेखील नाशिक शहरास घातक प्लास्टिक येतच असून, त्याचा सर्रास वापर केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने दंडात्मक कारवाई वेगाने सुरू केली असली तरी प्लास्टिकचे मूळ शोधण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले असून, त्यानुसार आता नाशिक शहरात किंवा लगतच्या काही भागात निकषांपलिकडे प्लास्टिक उत्पादीत केले जाते आहे काय, याचा शोध घेण्यात येत आहे. प्लास्टिक नष्ट होत नसल्याने त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. नदी-नाल्यात किंवा भुयारी गटारीच्या चेंबरमध्ये प्लास्टिक अडकून पावसाळ्यात अवघे शहर जलमय होण्याचे प्रकार वेळोवेळी घडले आहेत. याशिवाय मुक्या जनावरांनी प्लास्टिक खाल्ल्यानंतर त्यांच्या जीवावर बेतण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्यामुळे खरे दर राज्य शासनाने बंदी घालण्याच्या आधीपासूनच नाशिक शहरात प्लास्टिक बंदीसाठी निकष जारी करून महापालिकेने कारवाईदेखील वेळोवेळी केली आहे. राज्यशासनाने बंदी घातल्यानंतर कारवाईला गती तर देण्यात आली. गेल्या एप्रिल ते नाेव्हेंबरपर्यंत महापालिकेने अशाच प्रकारे प्लास्टिक वापरकर्त्यांकडून २ लाख ५४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे; परंतु शहरात येणाऱ्या आणि टाळता न येणाऱ्या प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या कॅरी बॅगपासून फर्नेश ऑईल तयार केले जाते. एक टन क्षमतेच्या या प्रकल्पातून तयार झालेले ऑईल खत प्रकल्पातच मृत जनावरांच्या भट्टीसाठी वापरले जाते; मात्र त्यानंतरदेखील शहरात प्लास्टिकचा वापर थांबला पाहिजे, यासाठी महापालिकेच्या आयुक्तांनी अलिकडेच झालेल्या बैठकीत नाशिकमधील आणि शहराच्या आसपासच्या भागात नियमबाह्य प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात प्लास्टिकवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.
कोट..
महापालिकेच्यावतीने प्लास्टिक निर्बंधावर जागृती करण्यात येत असल्याने नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे; मात्र व्यापारी वर्गाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने कठोर दंडात्मक करवाई करण्याचे काम सुरू केले आहे.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक, घनकचरा व्यवस्थापन, महापालिका
इन्फो...
या ठिकाणहून येते प्लास्टिक
राज्यात प्लास्टिक बंदी असली तरी नाशिकमध्ये अन्य राज्यातून येणाऱ्या मालाचे वेष्टन म्हणून प्लास्टिक जमा होते. त्याचप्रमाणे ऑनलाइन शॉपिंगमध्येदेखील वेगवेगळ्या प्रकाराचे प्लास्टिक येत असल्याने अडचण निर्माण होत आहे.