नाशिक: एस. टी. महामंडळाकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी या वर्षापासून स्मार्टकार्ड अनिवार्य करण्यात आलेले आहे. मात्र अद्यापही विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड मिळू शकलेले नाही. सवलतधारकांना लाखोंच्या संख्येने स्मार्ट कार्ड लागणार असल्याने संभाव्य विलंब लक्षात घेता महामंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत स्मार्ट कार्ड मिळू शकेल, अशी शक्यता वर्तविली आहे.पंधरा दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाने विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य केले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी जवळपास २३ प्रकारच्या सवलती दिल्या जातात. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली असून, स्मार्टकार्डअभावी विद्यार्थ्यांची तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी सवलतधारकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आल्याने स्मार्ट कार्ड घेण्यास १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने स्मार्ट कार्ड घेण्यासाठी एसटी केंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आदी सवलतधारकांचीही गर्दी होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणातील सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी तसेच इतर सवलतधारकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी जुन्या पद्धतीच्या पासच्या आधारे तर इतर सवलतधारकांना प्रचलित ओळखपत्राच्या आधारे प्रवास सवलत देण्याचा निर्णय घेण्यात महामंडळाने घेतला असून सध्याची जुनीच पद्धती अवलंबण्यात येणार आहे.राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व कार्यालयांना यासंदर्भात सूचना एसटी मुख्यालयातून सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व सवलतधारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग इत्यादी) तत्पूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर २०१९ अखेर संबंधित यंत्रणांकडे संपर्क साधून आपापली स्मार्ट कार्ड काढून घ्यावीत, असे आवाहनदेखील महामंडळाने केले आहे. ज्यांना स्मार्ट कार्ड प्राप्त झाले आहे ते मात्र या कार्डचा वापर करू शकतात.३५ लाख विद्यार्थी लाभधारक४राज्यात सध्या सुमारे ३५ लाख विद्यार्थी आणि साधारण ५० लाख ज्येष्ठ नागरिक हे विविध सवलतींचे लाभार्थी आहेत. याशिवाय स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार, राज्य शासनाचे पुरस्कार विजेते, दुर्धर आजारग्रस्त आदींना एसटी महामंडळामार्फत सवलत देण्यात येते. या सर्वांना आता स्मार्ट कार्ड घेण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
एसटीच्या स्मार्ट कार्ड सवलतीला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 12:41 AM