मालविक्रीतून आलेले जादाचे पैसे प्रामाणिकपणे केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2021 10:53 PM2021-06-15T22:53:21+5:302021-06-16T00:39:42+5:30

उमराणे : खारीपाडा (ता.देवळा) येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारातील एका व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीतून आलेले जादाचे वीस हजार रुपये शेतकऱ्याने, प्रामाणिकपणे परत केल्याने कृषी बाजाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

The extra money from the sale was honestly returned | मालविक्रीतून आलेले जादाचे पैसे प्रामाणिकपणे केले परत

प्रामाणिकपणे शेतकर्‍याचा सत्कार करताना श्रीपाल ओस्तवाल समवेत खंडू देवरे, तसेच व्यापारी व कांदा विक्रेते शेतकरी.

Next
ठळक मुद्देदेवळा : श्री रामेश्वर कृषी बाजाराच्या वतीने शेतकऱ्याचा सन्मान

उमराणे : खारीपाडा (ता.देवळा) येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारातील एका व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीतून आलेले जादाचे वीस हजार रुपये शेतकऱ्याने, प्रामाणिकपणे परत केल्याने कृषी बाजाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृषी बाजारात कांदा खरेदी-विक्रीतून लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याने, बहुतांशी वेळा कांदा विक्रेते शेतकरी व कांदा खरेदीदार व्यापारी यांचेकडून नजरचुकीने कमी-अधिक पैशांची देवाण घेवाण होते. परिणामी, झालेल्या चुकीचा फटका सहन करावा लागतो, परंतु सध्याच्या युगात अजूनही प्रामाणिकपणा टिकून असल्याने वेळोवेळी बहुतांशी ठिकाणी जाणवते. याचाच प्रत्यय खारीपाडा येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारात घडला.

ताहराबाद येथील शेतकरी पांडुरंग दादाजी सावळे यांनी रामेश्वर कृषी बाजारात कांदा विक्रीस आणला होता. लिलाव होऊन सदर कांदा रेणुका आडत दुकानामार्फत खरेदी करण्यात आला असता, त्या मालाची एकूण रक्कम ३६,३७७ रुपये इतकी होती, परंतु संबंधित व्यापाऱ्याकडून नजरचुकीने या शेतकऱ्यास ५६,३७७ रुपये एवढी अदा केली गेली. सदर शेतकऱ्याने चुकवती न बघता, पैसे मोजून घरी गेला असता, मालविक्रीतून आलेल्या पैशांव्यतिरिक्त वीस हजार रुपये जास्त आल्याचे निदर्शनास आले, परंतु वाढीव पैशांचा मोह न बाळगता, हे पैसे दुसर्‍याच दिवशी कृषी बाजारात येऊन संबंधित व्यापाऱ्यास प्रामाणिकपणे परत केले. अशा प्रामाणिक शेतकऱ्याचा मार्केटचे मुख्य संचालक श्रीपाल ओस्तवाल व कांदा व्यापारी खंडू देवरे यांच्या हस्ते लिलावाच्या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी कांदा व्यापारी संतोष बाफणा, योगेश पगार, सचिन देवरे, प्रवीण बाफणा, शैलेश देवरे, अमोल देवरे, नितीन काला व इतर व्यापारी उपस्थित होते.

 

Web Title: The extra money from the sale was honestly returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.