मनसेच्या पदरी अपयश, मात्र सूर गवसतोय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 01:33 AM2019-10-26T01:33:56+5:302019-10-26T01:34:31+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणांगणातच उतरायचे किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत मनसेने एकदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रणांगणातच उतरायचे किंवा नाही अशा द्विधा मन:स्थितीत मनसेने एकदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यात सहा जागा लढविल्या सर्वच जागांवर पराभव पत्कारावा लागला. मात्र, शहरातील दोन मतदारसंघात उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद मात्र लक्षणीय असून त्यामुळे मनसेला सूर गवसू लागल्याचे चित्र दिसत आहे.
नाशिक पूर्वतील संभाव्य उमेदवार राहुल ढिकले हे भाजपत गेले. ज्यांच्या हाती सर्व सूत्रे तेच पक्ष सोडून गेल्याने पक्षाची अवस्था बिकट झाली. नाशिक पूर्वमधील ऐनवेळी उमेदवारी दिल्यानंतर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यामुळे सहा उमेदवार रिंगणात होते. मुर्तडक यांनी माघार घेतल्यानंतर नाशिक पूर्वत राष्टÑवादीला पाठिंबा देऊन भाजपाला सक्षम उमेदवार देण्याचे ठरले. त्या बदल्यात नाशिक मध्यमध्ये आघाडीने मनसेला पाठिंबा देण्याचे ठरले होते. मात्र मध्यमध्ये तसे घडले नाही. आघाडीने शब्द पाळला नाही. अर्थात, त्यानंतरही मनसेचे उमेदवार आणि माजी आमदार नितीन भोसले यांना तब्बल २२,१४० हजार मते मिळाली. त्याचबरोबर नाशिक पश्चिम मध्येदेखील मनसेकडे ऐनवेळी आलेल्या दिलीप दातीर यांनी २५ हजार मते घेतली आहेत. इगतपुरीत योगेश शेवरे, देवळीत ऐनवेळी आलेले सिद्धांत मंडाले दिंडोरीत टीकाराम बागुल किंवा पेठ सुरगाण्यात सुरेश ठाकरे हे उमेदवार केवळ औपचारिक होते. शहरी भागात मनसेला पुन्हा सूर गवसत असल्याचे दिसून आले.