लसीकरण केंद्राच्या नावे बनावट 'वेब पेज'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 06:43 PM2021-05-11T18:43:19+5:302021-05-11T18:44:10+5:30
एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते.
नाशिक : सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र, सिन्नरफाटा, येथे कोरोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध असल्याची माहिती बनावट वेब पेजद्वारे जनसामान्यात प्रसारित केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका अज्ञात व समाजकंटक प्रवृत्तीच्या व्यक्तीने नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करीत सोमवारी (दि.१०) गुगलवर लसीकरणाबाबत बनावट वेब पेज तयार केले होते. लसीकरणाची खोटी माहिती या पेजवर प्रसारित करून जनतेची दिशाभूल केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवराज बोरसे हे करीत आहेत.
तडीपार गुंडास अटक
नाशिक : शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात सर्रासपणे वावरणाऱ्या एका सराईत तडिपार गुंडाला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे.
संकेत भाऊराव शिंदे (२८, रा. पांजरा चाळ, किशोर सुर्यवंशी मार्ग, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विजय विधाते यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संकेत शिंदे यास दोन वर्षांसाठी उपायुक्त यांनी तडिपार केले होते. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून तडिपार केलेले आहे. असे असतानाही तो कोणतीही पूूर्वपरवानगी न घेता राहते घराच्या परिसरात हातात लोखंडी कोयता घेऊन आरडाओरड करत एकाएकाला जीवे ठार मारीन, अशा धमक्या देत दहशत पसरवत असल्याचे समजताच म्हसरूळ पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.